Tue, Jul 23, 2019 10:45होमपेज › Solapur › प्राध्यापक दाम्पत्यास मारहाण करणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

प्राध्यापक दाम्पत्यास मारहाण करणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 27 2017 9:56PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

सभासद करण्यासाठी 5 लाख रुपये देण्यासाठी, तसेच सोलार सिस्टीमचा ठेका भाच्याला देण्यात यावा म्हणून प्राध्यापक दाम्पत्यास अश्‍लील शिवीगाळ करून मारहाण करणार्‍या संस्थेच्या महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षाविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. पी. पी. कुलकर्णी (वय 56, रा. शोभानगर, सात रस्ता) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत प्रा. प्रमोद दामोदर वैद्य (वय 43, रा. विनय सोसायटी, विजापूर रोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. प्रा. वैद्य हे शिक्षण प्रसारक   मंडळी, पुणे संचलित मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सोलापूर येथे कार्यरत असून त्यांची पत्नीसुद्धा याच ठिकाणी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.  प्रा. पी. पी. कुलकर्णी हे नियामक मंडळाचे स्थानिक सदस्य असून, ते महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष  म्हणून कामकाज पाहतात. 

8 डिसेंबर रोजी दुपारी प्रा. वैद्य हे त्यांच्या कक्षामध्ये असताना प्रा. पी. पी. कुलकर्णी यांनी त्यांना संचालक कक्षामध्ये बोलावून घेऊन आता मी संस्थेचा  अध्यक्ष झालो आहे, तुझ्याबद्दल  नियामक मंडळाच्या अध्यक्ष व इतर सदस्यांकडे वाईट मत आहे, तुला जर नीट राहायचे असेल तर माझे ऐकावे लागेल, न ऐकल्यास अध्यक्षांना सांगून तुझी बदली करेन, कारण   बाकीच्या  महाविद्यालयावरसुध्दा आमचे बहुमत झाले आहे, तिथे माझे वर्चस्व आहे, नियामक मंडळाच्या अध्यक्षांनी मला नवीन सभासद करण्यास सांगितले आहे, त्याकरिता  तू मला  5 लाख   रुपये दे, नाही  तर कारवाई करुन बदली करेन, अशी धमकी दिली तसेच संस्थेमध्ये सोलार सिस्टिम बसविण्यात येणार असून त्याचा ठेका माझ्या भाच्यास दे व त्यामध्ये पैसे अ‍ॅडजेस्ट कर, असे म्हणून धमकी दिली.

मंगळवारी दुपारी प्रा. वैद्य हे संस्थेच्या कार्यालयात असताना प्रा. पी. पी. कुलकर्णी आले व त्यांनी वैद्य यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. कुलकर्णी यांनी वैद्य यांच्या प्राध्यापिका पत्नीलासुध्दा शिवीगाळ करुन वैद्य यांच्या गळ्याला धरुन अ‍ॅन्टी चेंबरमध्ये  घेऊन जाऊन पैसे दे म्हणून चापटा मारून ढकलून दिले. मारहाणीचा आवाज ऐकून कार्यालयातील इतर प्राध्यापक व शिपाई हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांनी वैद्य यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली म्हणून वैद्य यांनी सदर बझार पोलिस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दाखल केली. याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार वाघमारे तपास करीत आहेत.