होमपेज › Solapur › सोलापूर : बनावट नोटा तयार करणार्‍या वृद्धास अटक

सोलापूर : बनावट नोटा तयार करणार्‍या वृद्धास अटक

Published On: Jan 23 2018 9:37PM | Last Updated: Jan 23 2018 9:36PMसोलापूर : प्रतिनिधी

शहरातील शुक्रवार पेठेत एका खोलीमध्ये चलनातील बनावट नोटा तयार करणार्‍या वृद्धास शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री अटक केली. जियाउद्दीन अमीनसाब दुरुगकर (वय 60, रा. शुक्रवार पेठ, जामा मशिदीच्या मागे)  असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

 शुक्रवार पेठेतील जामा मशिदीच्या मागे जियाउद्दीन दुरुगकर नावाची व्यक्‍ती एका खोलीमध्ये कलर प्रिंटरच्या मदतीने चलनी नोटांची झेरॉक्स प्रिंट काढून त्या  बनावट नोटा व्यवहारात आणणार असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास शुक्रवार पेठेतील दुरुगकर याच्या खोलीवर छापा मारला. त्यावेळी खोलीमध्ये प्रिंटरवर प्रिंट काढत असताना जियाउद्दीन दुरुगकर मिळून आला. त्यानंतर पोलिसांनी खोलीची झडती  घेतली असता, खोलीमध्ये कलर प्रिंटर, स्कॅनर  मिळून  आला. स्कॅनरमध्ये   एका  पानावर 2 हजार रुपये आणि 5 रुपयांच्या नोटांची कलर झेरॉक्स प्रत मिळाली. नोटांच्या कलर झेरॉक्सचा गठ्ठा व पांढरे कोरे कागद मिळून आले. 100 रुपये दराच्या आकाराच्या एक बाजूस छपाई केलेले तुकडे  व  त्याच मापाचे उर्दू पेपरचे कटिंग केलेले कागदाचे गठ्ठे मिळून आले. हे साहित्य जप्त केले असून, पोलिसांनी दुरुगकर यास अटक केली.

याबाबत  जेलरोड पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार तोटदार यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, हवालदार पवार, कोतवाल, पोलिस नाईक पवार, पापडे, सावंत यांनी केली. पोलिस उपनिरीक्षक चानकोटी तपास करीत आहेत.