Sun, Jul 21, 2019 09:51होमपेज › Solapur › सायबर गुन्हे रोखण्यासाठी नवीन अ‍ॅप्स गरजेचे: भटकर

सायबर गुन्हे रोखण्यासाठी नवीन अ‍ॅप्स गरजेचे: भटकर

Published On: Dec 01 2017 7:41PM | Last Updated: Dec 01 2017 7:41PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

वाढत्या सायबर गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिस दलातही सायबर तज्ज्ञ आणि नवनवीन अ‍ॅप्स निर्माण झाले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मश्री, पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी केले. 
सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या अत्याधुनिक पोलिस नियंत्रण कक्षाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन तसेच नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या ई-तक्रार केंद्राचा शुभारंभ डॉ. भटकर यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. भटकर म्हणाले, देश डिजिटल इंडियाकडे वाटचाल करीत आहे. पोलिसांनाही नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती असली पाहिजे. बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती आत्मसात करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पोलिस दल हे डिजिटल सेवांकडे वाटचाल करीत आहे. त्यातूनच सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने आधुनिकतेचे हे नवे पाऊल टाकून डिजिटल नियंत्रण कक्ष उभारले आहे. डिजिटल इंडियाच्या मोहिमेत पोलिसही मागे नाहीत, यातूनच हे दिसून येते, असेही पद्मभूषण डॉ.  भटकर यांनी सांगितले.