Sat, Jul 20, 2019 09:09होमपेज › Solapur › मुस्लिम कुटुंबाची मराठी भाषेत लग्नपत्रिका

मुस्लिम कुटुंबाची मराठी भाषेत लग्नपत्रिका

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 28 2017 1:27AM

बुकमार्क करा
सोलापूर ः अमोल व्यवहारे

 मुस्लिम समाजबांधवांच्या लग्नपत्रिका या साधारणतः देवनागरी लिपीमधल्या उर्दू भाषेत तथा फारसी लिपीतल्या उर्दू भाषेत छापली जातात. पण हसीब नदाफ आणि बदिउज्जमा बिराजदार यांनी आपल्या मुलांच्या लग्नाच्या पत्रिका अनुक्रमे उर्दू इंग्रजीसह, मराठी आणि संस्कृत भाषेत छापून महाराष्ट्रीयन संस्कृतीशी आपली नाळ घट्टपणे जोडली असल्याचे सिध्द करत एकात्मतेचा संदेश़ दिला आहे. हसीब नदाफ हे सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचे वडील डॉ. अ.अजिज नदाफ हे विख्यात साहित्यिक व शाहीर आहेत. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणे यांच्यासोबत योगदान दिले आहे. मुस्लिम मराठी साहित्य सुरु करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सुरुवातीपासून नदाफ परिवाराची मुस्लिम मराठी परिवार म्हणून ओळख आहे. त्यांचे मित्रदेखील

समाजातील विविध जात वर्गात आहेत. त्यांनी त्यांचे हे सामाजिक स्नेहबंध जपण्यासाठी हसीब नदाफ यांच्या मुलाच्या आणि मुलीच्या लग्नाची पत्रिका मराठीत छापली.  तर बदिउज्जमा बिराजदार हे मुस्लिम मराठी साहित्यिक आहेत. एक गझलकार म्हणून ते महाराष्ट्रात परिचयाचे आहेत. त्यांचे वडील हे संस्कृत भाषेचे तज्ज्ञ होते. बदिउज्जमा बिराजदार यांचे सोलापूरच्या साहित्य वर्तुळात मोठे प्रस्थ आहे. त्यामुळेच त्यांनी उर्दू, इंग्रजी सोबत मराठी आणि संस्कृत भाषेत विवाहपत्रिका छापून राष्ट्रीय आणि भाषिक एकात्मतेचा संदेश दिला आहे.  

मराठी आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग ः नदाफ
मुस्लिम मराठी आहोत. आम्ही महाराष्ट्रीयन आहोत. आमची या मातीशी जवळीक आहे. भाषेचा जात धर्माशी संबंध नाही. माझी सहीदेखील मी मराठी भाषेतच करतो. मराठी हा आमच्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे म्हणून लग्नपत्रिका मराठीत छापली. - हसीब नदाफ

एकात्मतेचा संदेश, साहित्य परंपरा जपली
माझे वडील संस्कृत भाषेचे तज्ज्ञ होते. त्यांनी  संस्कृतचा मोठा अभ्यास केला होता. माझेही साहित्य क्षेत्रात खूप मित्र आहेत. त्यात विविध भाषिक आहेत. त्यांना कळावे म्हणून संस्कृत, मराठी आणि इंग्रजी, उर्दू भाषेत पत्रिका छापल्या आहेत. - बदिउज्जमा बिराजदार, गझलकार, साहित्यिक