होमपेज › Solapur › आजच्या महापालिका अर्थसंकल्पात हद्दवाढ, पाण्यासाठी भरपूर निधी! 

आजच्या महापालिका अर्थसंकल्पात हद्दवाढ, पाण्यासाठी भरपूर निधी! 

Published On: Jun 12 2018 12:54AM | Last Updated: Jun 12 2018 12:10AMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिकेच्या अर्थसंकल्पात हद्दवाढ भागाचा विकास आणि सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी मुबलक निधीची तरतूद करणार असल्याची माहिती भाजपचे सभागृहनेता संजय कोळी यांनी दिली. मंगळवार, 12 जून रोजी पालिकेचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर होणार आहे.

महापालिकेचा सन 2018-19 या आर्थिक वर्षाचा सुमारे बाराशे कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाने स्थायी समितीकडे सादर केला होता. दरम्यान, स्थायी समिती सभापतीचा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. अर्थसंकल्पाला उशीर होत असल्याने प्रशासनाने अर्थसंकल्प महापालिका सर्वसाधारण सभेकडे पाठवण्याच्या सूचना महापौर शोभा बनशेट्टी व सभागृहनेता संजय कोळी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने सर्वसाधारण सभेकडे अर्थसंकल्प सादर केला होता. प्रशासनाकडून अर्थसंकल्पात मोठे फेरबदल करण्यात आले असून अर्थसंकल्पाचा आकडा आणखी फुगल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये हद्दवाढ भाग आणि पाणीपुरवठा यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. वित्तीय तूट राहणार नाही यासाठी सत्ताधार्‍यांनी अधिकाधिक प्रयत्न केले असून कोणत्याही नगरसेवकाला विकासकामांसाठी निधीची कमतरता राहू नये याकडे लक्ष देण्यात आले असल्याची माहिती कोळी यांनी दिली.पुढच्या वर्षी होणार्‍या 

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांना डोळ्यासमोर घेऊन बजेट होण्याची शक्यता आहे. सभागृहात भाजप नगरसेवकांच्या संख्येपेक्षा एकत्रित सर्व विरोधी पक्षांच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे. या अर्थसंकल्पास विरोधकांनी विरोध केल्यास बजेट मंजुरीत सत्ताधार्‍यांना अडचण येऊ शकते. परंतु शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा, एमआयएम, माकप हे विरोधी पक्ष एकत्र येण्याबाबत संदि:ग्धता असल्याचीही चर्चा आहे.

बजेटची अंमलबजावणी यंदा तरी होणार का?

गेल्यावर्षीच्या बजेटची अंमलबजावणी झाली नसल्याची ओरड नगरसेवकांकडून सुरु होती. कारण नगरसेवकांना बजेटनुसार वॉर्ड विकास निधी मिळालेला नव्हता. आज होणार्‍या बजेटची तरी अंमलबजावणी होणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.