Fri, Nov 16, 2018 21:20होमपेज › Solapur › आरोग्य सेवा संचालकांची तत्काळ हकालपट्टी करा : उच्च न्यायालय

आरोग्य सेवा संचालकांची तत्काळ हकालपट्टी करा : उच्च न्यायालय

Published On: Jan 14 2018 1:55AM | Last Updated: Jan 13 2018 9:09PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रशासन लवाद (मॅट), उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांची निवड बेकायदा ठरवून स्पष्टीकरण मागितले होते. त्यावर  समाधानकारक उत्तर न आल्याने शुक्रवारी उच्च न्यायालयाने डॉ. पवार यांची तत्काळ हकालपट्टी करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ही निवड बेकायदा ठरवून तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही डॉ. पवार यांच्यावर कारवाई करण्यात न आल्याने उच्च न्यायालयाने सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी दर्शवली होती. सरकार या अधिकार्‍याला पाठीशी घालत आहे असा संशय घ्यायला जागा आहे, असे निरीक्षण मागील सुनावणीत नोंदवले.

त्यावर सारवासारव करत सरकारी वकिलांनी डॉ. पवार यांना पदावरून हटवायचे की नाही, याबाबत चार दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन न्यायालयाला दिले होते. दरम्यान, डॉ. सतीश पवार यांच्या बेकायदेशीर नियुक्तीबाबत डॉ. मोहन जाधव आणि डॉ. रत्ना रावखंडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने डॉ. पवार यांच्या सेवेची सरकारला एवढी नितांत गरज काय, सरकारचे त्यांच्यावाचून अडते काय? असा सवाल करून कोणतीही व्यक्ती संस्थेपेक्षा मोठी नाही, अशा शब्दांत सरकारला सुनावले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीत हा प्रश्‍न निकाली काढला आहे. संचालकपदाची नियुक्ती होईपर्यंत सेवाज्येष्ठतेनुसार हंगामी संचालक नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.