Thu, Jul 18, 2019 08:55होमपेज › Solapur › सोलापूर बंद शांततेत पार पाडल्याचे कौतुकच

सोलापूर बंद शांततेत पार पाडल्याचे कौतुकच

Published On: Aug 01 2018 1:36AM | Last Updated: Jul 31 2018 11:12PMलोकशासन : प्रशांत माने

भारत देशच नव्हे तर संपूर्ण जगासाठीच आदर्श मोर्चाचा पाठ घालून देणार्‍या मराठा समाजाचे गतवर्षी निघालेले 58 मूकमोर्चे निश्‍चितच इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले जातील. परंतु शांतीच्या मार्गाने मागण्या पूर्ण होत नसल्याचे जाणवताच शांती मूकमोर्चाचा परिपाठ घालून देणार्‍या मराठा समाजाने आता सुरु केलेल्या मराठा ठोक मोर्चाला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याने गतवर्षी कौतुकास पात्र ठरलेला मराठा समाज यावेळी मात्र टिकाकारांच्या नजरेतून सुटलेला नाही. महाराष्ट्रात मोर्चे हिंसक वळण घेत असताना 30 जुलै रोजी सोलापूर बंदचे आंदोलन कसे होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. परंतु हा सोलापूर बंद काही किरकोळ अनुचित प्रकार वगळता शांततेत पार पडला, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. सोलापुरातील सर्वच समाजांनी आणि घटकांनी उत्स्फूर्तपणे 100 टक्के सोलापूर बंद ठेवून मराठा मोर्चा आणि त्यांच्या मागणीला समर्थन दिल्याचे स्पष्ट होत आहे.

गतवर्षी शांती आणि स्वच्छतेचा परिपाठ घालून देत निघालेल्या मोर्चांनी मागण्या मान्य होत नसल्याचे जाणवताच यावेळी मराठा समाज आक्रमक झाल्याचे चित्र आहे. यावेळी महाराष्ट्रात निघत असलेले ठोकमोर्चे उग्ररुप धारण करतील अशी कल्पना महाराष्ट्राच्या गुप्तचर खात्याकडे नव्हती का?, शासनाला त्यांनी अहवाल दिला नाही का?,

हाराष्ट्रातील गृहखात्याचे हे अपयश आहे का? आणि जर का गुप्तचर संस्थांनी शासनाला अहवाल दिले असतील तर शासनाने ठोकमोर्चांकडे कानाडोळा का केला?, असे अनेक प्रश्‍न जाणकारांना निश्‍चितच पडले असणार आहेत. ‘ठोकमोर्चा’ असे नाव पाहूनच हे मोर्चे उग्ररुप धारण करतील, अशी शक्यता स्वीकारुन शासनाने खरेतर मराठा समाज मोर्चेकरी घटकांशी चर्चा करणे गरजेचे होते. गतवर्षीच्या मूकमोर्चानंतर मंत्रालयात मंत्र्यांची उपसमिती गठीत करुन आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी मराठा संघटनांच्या बैठका होत होत्या. तरीदेखील हा प्रकार सुरु असल्याने सरकार संवादात कमी पडले का, अशी शंका उपस्थित होणे साहजिक आहे. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आरक्षण कधी देणार याबद्दल वेळापत्रकासह कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा म्हणजे महाराष्ट्रातील आंदोलन स्थगित करण्यात येईल, असे कळविले आहे. शासनाने मोर्चाच्या या पत्राला वेळ न दवडता प्रतिसाद देण्याची गरज आहे. तरच पेटलेला महाराष्ट्र शांत होईल आणि आजपर्यंत झालेली हानी पाहता पुढील संभाव्य धोके टाळता येतील. शासन काय भूमिका घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.