Thu, Apr 25, 2019 04:10होमपेज › Solapur › मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दहा हजारांचे वसतिगृह अनुदान 

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दहा हजारांचे वसतिगृह अनुदान 

Published On: Feb 19 2018 1:19AM | Last Updated: Feb 18 2018 11:13PM सोलापूर : प्रतिनिधी 

उच्च शिक्षणासाठी मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांना शहरात आसरा घ्यावा लागतो, मात्र त्याठिकाणी राहण्याची सोय नसल्याने त्यांच्या शिक्षणात अडचणी येतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आता दहा हजार रुपयांचे वसतिगृह अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानानिमित्त सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, महामंडळचे सहायक संचालक दिलीपराजे कुंभार, विजयकुमार बरबडे, अशोक निंबर्गी आदी उपस्थित होते.  यावेळी बोलताना सहकार मंत्री म्हणाले, मराठा क्रांती मोर्चानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. ते काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जागेचा शोध सुरू असून वसतिगृहाच्या बांधकामासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या प्रक्रियेला काही वेळ जाणार आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी लवकर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी वसतिगृह अनुदान देण्याची योजना हाती घेण्यात येणार असल्याचे ना. देशमुख यांनी सांगितले. मोठ्या शहरात राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी दहा हजार, तर छोट्या शहरातील विद्यार्थ्यांसाठी आठ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आरक्षणाविषयी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीचा अहवाल न्यायालयासमोर ठेवून मराठा आणि कुणबी समाजाचे दाखलेही लवकरच मिळतील, असा विश्‍वास ना.देशमुख यांनी व्यत केला.