Thu, Jul 16, 2020 10:18होमपेज › Solapur › ग्रा.पं.चा संमिश्र निकाल

ग्रा.पं.चा संमिश्र निकाल

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 28 2017 1:27AM

बुकमार्क करा
सोलापूर ः प्रतिनिधी

ग्रामपंचायतीसाठी दुसर्‍या टप्प्यात झालेल्या निवडणुकीचा बुधवारी निकाल जाहीर झाला. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपशी संबंधित गटांना संमिश्र यश मिळाल्याचे स्पष्ट झाले. दुसर्‍या टप्प्यात माढा तालुक्यातील 12, करमाळा तालुक्यातील 13, तर बार्शी तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीतही मोठी चुरस दिसून आली. माढ्यात संमिश्र कौल माढा तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांनी संमिश्र स्वरूपाचा कौल दिला. कन्हेरगाव, अंजनगाव, वडशिंगे, मुंगशी या ग्रामपंचायतींत थेट सत्तांतर झाले. टेंभुर्णी, आढेगाव, पिंपळखुंटे या ठिकाणी सरपंच एकाचा, तर बहुमत विरोधकांकडे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वडोली ग्रामपंचायत वगळता इतर सर्व ग्रामपंचायतींत शिंदे बंधूंचीच सत्ता आली आहे.

करमाळ्यात पाटील गटाचे वर्चस्व

तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींत  आ. नारायण पाटील यांच्या गटाने घवघवीत यश संपादन केले आहे. 13 पैकी 8 ग्रामपंचायतींची सत्ता आ. पाटील गटाकडे मोठ्या मताधिक्क्याने मतदारांनी दिली आहे. जि.प. अध्यक्ष संजयमामा शिंदे गटाकडे 4 ग्रा.पं.ची सत्ता आली आहे. माजी आ. शामल बागल गटाकडे रामवाडी, भगतवाडी, गुलमोहरवाडी या ग्रामपंचायतीची सत्ता आली असून, मौजे उंदरगाव, राजुरी, केत्तूर या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायत सदस्यपदांवर आमच्या गटाचे  बहुमत असल्याचा दावा बागल गटाकडून करण्यात आलेला आहे.

बार्शीत राष्ट्रवादी, भाजपचे यश

तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने, तर एका ग्रामपंचायतीवर भाजपने दावा केला आहे.  उंडेगावच्या सरपंचपदी शामलताई साहेबराव सलगर, अंबाबाईचीवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी सत्यवती भारत माळी, तर मुंगशी (वा.) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिनेश रामचंद्र राक्षे हे निवडून आले आहेत.निकाल घोषित झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण केली. समर्थकांनी आपापल्या नेत्यांकडे जाऊन आनंदोत्सव साजरा केला. आजी-माजी आमदारांसह मिरगणे समर्थकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या समर्थकांना यश आल्याचे दावे केले आहेत.  विजयाबाबत दावे प्रतिदावे करण्यात आले.

उंडेगाव व अंबाबाईचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी समर्थक निवडून  आल्याचा दावा आ. सोपल गटाकडून करण्यात आला आहे. मुंगशी (वा) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाचे समर्थक सरपंचपदावर विराजमान झाल्याचे सांगण्यात आले. अंबाबाईचीवाडी येथे स्थानिक आघाडीचे सदस्य निवडून आले आहेत. माढा ः निकाल जाहीर होताच कार्यकर्ते असा जल्लोष करीत होते. (छाया ः मदन चवरे, माढा) 27 एसओ. 20