Thu, Jun 27, 2019 15:45होमपेज › Solapur › ‘जीआयएस’चा मक्ता रद्द करण्यावर एकमत 

‘जीआयएस’चा मक्ता रद्द करण्यावर एकमत 

Published On: Mar 25 2018 1:40AM | Last Updated: Mar 24 2018 9:28PMसोलापूर : प्रतिनिधी 

शहरातील मिळकतींचे जीआयएस सर्व्हे करण्याचा बहुचर्चित मक्ता रद्द करण्याविषयी शनिवारी  सत्ताधारी व विरोधी पक्षांचे एकमत झाले. या कंपनीच्या कामाबद्दल बैठकीत असमाधान व्यक्त करतानाच या कंपनीकडून दंड वसूल करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. जीआयएसच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापौर शोभा बनशेट्टी यांनी महापालिका सभागृहात सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. यावेळी काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव, एमआयएमचे गटनेते तौफिक शेख तसेच अन्य 27 नगरसेवक उपस्थित होते.

उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील, नगरअभियंता लक्ष्मण चलवादी, नोडल ऑफिसर सचिन कांबळे आदी अधिकारीवर्ग यावेळी उपस्थित होता. चेतन नरोटे, किसन जाधव, शिवसेनेचे गुरुशांत धुत्तरगावकर यांच्यासह अनेक नगरसेवकांनी जीआयएसच्या कामाविषयी प्रश्‍नांची सरबत्ती करीत प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. जीआयएसच्या मक्त्याचे काम वेळेवर न झाल्याने मनपाचे मोठे नुकसान झाले. सायबरटेक कंपनीला मुदतीत काम न केल्याबद्दल दंड का केला नाही, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. सन 2014 मध्ये या कंपनीला मक्ता देण्यात आला.

तद्नंतर सन 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती यावेळी प्रशासनाकडून देण्यात आली. मनपाचे रिव्हिजन दर चार वर्षांनी करणे अपेक्षित असताना या कामाचा मक्ता का दिला? यासह अनेक प्रश्‍नांची मालिका यावेळी उपस्थित करण्यात आली. नगरसेवक रिजाज खरादी, अविनाश बोमड्याल, विनोद भोसले, श्रीनिवास करली, डॉ. अनगिरे, फिरदोस पटेल, श्रीदेवी फुलारे आदींनी यावेळी प्रश्‍न विचारले. शेवटी कंपनीचे काम असमाधानकारक तसेच मनपास नुकसानकारक असल्याचा सूर आळवित हा मक्ताच रद्द करावा तसेच कंपनीकडून दंड वसूल करावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. महापौरांनी याबाबत आयुक्तांना आदेश देणार असल्याचे सांगत बैठकीचा समारोप केला. 
 

 

tags : Solapur,news, gis Survey concession canceled issue in Solapur Municipal Corporation