Fri, Jul 19, 2019 20:36होमपेज › Solapur › कर्ज देतो म्हणून पोलिसालाच साडेपाच लाखांना गंडविले

कर्ज देतो म्हणून पोलिसालाच साडेपाच लाखांना गंडविले

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 14 2017 9:59PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

कर्ज देतो असे सांगून पोलिसालाच 5 लाख 40 हजार रुपयांना  फसविल्याप्रकरणी  सदर बझार पोलिस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा  प्रकार ऑनलाईनवर झाला असून गुन्हे उघडकीस आणणार्‍यालाच ऑनलाईनवाल्यांनी चांगलाच झटका दिला आहे.

पोलिसशिपाई   सतीश तानाजी काटे (ब. नं. 743, नेमणूक- दंगा नियत्रंक पथक, सोलापूर शहर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदीप पाटील, माही चावला, अभिषेक नाईक, मिथिलेश कुमार, सत्येंद्र राम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काटे हे दंगा नियत्रंण पथकामध्ये कार्यरत असून गेल्या महिन्यात एका वृत्तपत्रामध्ये छापून आलेल्या जाहिरातीमधील मोबाईल नंबरवर त्यांनी फोन करून त्यांनी लोन मिळण्याबाबत चौकशी केली होती. त्यानंतर काटे यांच्याशी समर्थ फायनान्समधून बोलतो असे सांगून संदीप पाटील (लोन विभाग), माही चावला (पेमेंट विभाग), अभिषेक नाईक (फायनान्स मॅनेजर), मिथिलेश कुमार (अकौंटंट मॅनेजर), सत्येंद्र राम (अकौंट विभाग) यांनी वेळोवेळी मोबाईल नंबरवरून संपर्क साधून काटे यांना त्यांना 24 लाख रुपये लोन मंजूर करतो असे सांगून काटे यांच्याकडून त्यांची कागदपत्रे ऑनलाईनवर मागून घेतली. 

त्यानंतर वरील सर्वांनी काटे यांना फोन करून त्यांना मिथीलेश कुमार व सत्येंंद्र राम यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार काटे यांनी डफरीन चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून त्या दोघांच्या खात्यांमध्ये वेळोवेळी 5 लाख 40 हजार 900 रुपये भरले. त्यानंतर काटे यांनी त्यांच्या लोनची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये कधी देणार याबाबत तगादा लावला असता त्यांनी कसलीही लोनची रक्कम दिली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे काटे यांच्या लक्षात आल्यानंतर काटे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक पवळ तपास करीत आहेत.