Mon, Apr 22, 2019 23:44होमपेज › Solapur › खोटी कागदपत्रे दिली; साबळे-वाघिरे कंपनीच्या मॅनेजरसह चौघांवर गुन्हा

खोटी कागदपत्रे दिली; साबळे-वाघिरे कंपनीच्या मॅनेजरसह चौघांवर गुन्हा

Published On: Dec 23 2017 2:14AM | Last Updated: Dec 22 2017 8:50PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

विडी कामगार महिलांची बनावट कागदपत्रे तयार करून ती भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे देऊन कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी साबळे-वाघिरे अँड कंपनीच्या मॅनेजरसह चौघांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साबळे-वाघिरे   अँड  कंपनी प्रा. लि. कंपनीचे मॅनेजर श्रीनिवास एन. जोशी, कंपनीचे भविष्य निर्वाह निधी सल्लागार डी. आर. कुलकर्णी, विडी कामगार   महिला  लक्ष्मीबाई  किसनसिंग बाडीवाले (वय 58, रा. उत्तर सदर बझार, मुर्गी नाला), सुमन भद्र शिवसिंगवाले (61, रा. संजयनगर, कुमठा नाका, सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत भविष्य निर्वाह निधी निरीक्षक सुनीता मकरंद चक्रदेव (वय 50, रा. स्वरनगरी बसंत, 203, आनंदनगर, हिंगणे खुर्द, पुणे, सध्या सुरवसे टॉवर, रेल्वेलाईन, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

सुनीता चक्रदेव या भविष्य निर्वाह निधी कार्यालयात भविष्य निधी निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर श्रीनिवास जोशी  हे साबळे-वाघिरे अँड कंपनीमध्ये  व्यवस्थापक  म्हणून कार्यरत  आहेत,   तर  कुलकर्णी हे कंपनीचे भविष्य निर्वाह निधीचे काम पाहतात.  साबळे-वाघिरे कंपनीमध्ये काम  करणार्‍या लक्ष्मीबाई बाडीवाले आणि सुमन शिवसिंगवाले या दोन विडी कामगार महिलांचा पेन्शनसाठी लागणार्‍या  कागदपत्रांमध्ये त्यांनी शाळा सोडल्याचा बोगस व बनावट दाखला   कंपनीच्यावतीने तयार करण्यात येऊन तो बनावट दाखला भविष्य निधी कार्यालयात सादर करण्यात आला.

कागदपत्रांच्या तपासणीमध्ये शाळा सोडल्याचा दाखला हा बनावट असल्याचे दिसून आल्याने याबाबत भविष्य निर्वाह निधी निरीक्षक सुनीता चक्रदेव यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस  निरीक्षक कजागवाले तपास करीत आहेत.