होमपेज › Solapur › ‘स्थायी’ सभापतीपद भाजप की सेनेकडे

स्थायी’ सभापतीपद भाजप की सेनेकडे

Published On: Mar 19 2018 1:49AM | Last Updated: Mar 18 2018 10:08PMसोलापूर : वेणुगोपाळ गाडी

महापालिका सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा फटका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. गंभीर चुकीमुळे हे पद सत्ताधार्‍यांकडे राहील की नाही, याचा फैसला सोमवारी उच्च न्यायालयात होणे अपेक्षित आहे.  पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख अशा दोन गटांनी महापालिकेत अक्षरश: उच्छाद मांडला आहे. एकमेकांना काटशह, कुरघोडी करण्याच्या प्रकारामुळे गेले वर्षभर सत्ताधार्‍यांचा ‘तमाशा’ पाहण्याची दुर्दैवी वेळ सोलापूरकरांवर आली आहे. ‘गल्ली ते दिल्ली’ या पक्षाला भरभरून मते दिल्यानंतर शहरवासीयांना या पक्षाकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र एक वर्षाचा मनपातील कारभाराचा लेखाजोखा पाहता भाजप ‘नापास’ झाले यात तीळमात्र शंका नाही.

दोन गटांच्या भिन्न भूमिका, टोकाचे मतभेद आदी कारणांमुळे महापालिका सर्वसाधारण सभेत अनेक मजेशीर गोष्टी पहावयास मिळाल्या. मनपा सभेत एकावेळी दोन सभागृहनेते पाहण्याचे ‘भाग्य’(?) देखील सर्वांना लाभले. स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत गटबाजीनेे कळसच गाठला. उमेदवारी डावलल्याने नाराज झालेल्या सहकारमंत्री गटाने बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावरुन झालेल्या दोन गटांच्या वादात अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. बंडखोराचा अर्ज भर निवडणूक निर्णय कार्यालयातून पळविण्यात आला. यानंतर दोन्ही गटांत समेट होऊन अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी सेनेच्या आक्षेपामुळे गदारोळ झाला. यावेळीदेखील भाजप उमेदवाराचा एक अर्ज पळविण्यात आला. या गोंधळात दुसर्‍या एका अर्जावर अनुमोदकाची सही करणे राहून गेल्याने ते भाजपला चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. 

अर्ज भरण्यावरुन झालेला वाद विभागीय आयुक्‍तांकडे पोहोचल्यानंतर त्यांनी पीठासीन अधिकार्‍यांना योग्य निर्णय घ्या, असे आदेश काढले. त्यानंतर काही तासांतच निवडणूक प्रक्रिया रद्द करून नव्याने निवडणूक कार्यक्रम घेण्याचा सुधारित आदेश काढला. राजकीय हस्तक्षेपामुळे असे झाल्याचा आरोप शिवसेनेने करीत उच्च न्यायालयात धाव घेतली.  उच्च न्यायालयाने फेरनिवडणुकीला स्थगिती दिल्याने भाजपला धक्‍का बसला. याप्रकरणी सोमवार, 19 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेनेने राजकीय दबावाचे पुरावे दिल्याने या पक्षाचा युक्‍तिवाद प्रबळ ठरेल, असा दावा केला जात आहे. याप्रकरणी सोमवारी निकाल लागणार की पुन्हा पुढील सुनावणी तारीख पडणार,  याचा अंदाज आजच्या घडीला करणे अशक्य आहे.

शुक्रवारी परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपची हार झाली होती. नशीबाने सेनेला साथ दिली. आता स्थायी सभापतीपदाबाबत दैव कुणाला अनुकूल राहील, याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. जर भाजपला ही निवडणूक प्रतिकूल ठरली तर सत्तेची सुत्रे विरोधकांकडे जाऊन मनपात चित्रविचित्र परिस्थिती उद्भवेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.