Tue, Mar 19, 2019 03:14होमपेज › Solapur › स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूर जि.प.ला राज्यस्तरीय पुरस्कार

स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूर जि.प.ला राज्यस्तरीय पुरस्कार

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 08 2018 10:47PMसोलापूर : प्रतिनिधी

स्वच्छ भारत सर्वेक्षण 2018 मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने देशात व राज्यात तृतीय क्रमांक पटकाविल्याने जिल्हा परिषदेचा व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत पाडळी, भागाईवाडी, सुस्ते व निमगाव ग्रामपंचायतींना शनिवारी औरंगाबाद येथे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ  बागडे यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

औरंगाबाद येथील संत तुकाराम महाराज नाट्यगृहात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, पाणी व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव अभय महाजन, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, आदर्श गाव हिवरे बाजारचे प्रणेते पोपटराव पवार, अवर सचिव एकनाथ मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानमध्ये सन 2016-17 मध्ये प्रथम पुरस्कारप्राप्त पाडळी, द्वितीय  पुरस्कारप्राप्त भागाईवाडी, तृतीय पुरस्कारप्राप्त सुस्ते, तालुका पंढरपूर व निमगाव टे, तालुका माढा या ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक यांना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. भागाईवाडीच्या सरपंच कविता घोडके-पाटील, तावशीच्या सरपंच सोनाली यादव, ग्रामसेविका ज्योती पाटील, ग्रामसेविका सुवर्ण घोडके, सरपंच बाळासाहेब लोहकरे, निमगाव टे.चे ग्रामसेवक सतीश धायगुडे, पाडळीचे ग्रामसेवक सुशेन ननावरे यांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 

स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये संपूर्ण देशात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मोहीम घेण्यात आली होती. या मोहिमेमध्ये  विशेष कामगिरी सोलापूर जिल्हा परिषदेने देशात व महाराष्ट्रात केली. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व ना. लोणीकर यांच्या हस्ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.