Wed, Apr 24, 2019 15:33होमपेज › Solapur › पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा : जिल्हाआधिकारी

पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा : जिल्हाआधिकारी

Published On: Dec 17 2017 1:32AM | Last Updated: Dec 16 2017 10:03PM

बुकमार्क करा

सोलापूर प्रतिनिधी  

पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट राष्ट्रीयीकृत बँकांनी पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीची बैठक झाली. त्या बैठकीत हा आराखडा प्रसिध्द करण्यात आला. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे सरव्यवस्थापक मोहन सांगवेकर, डीआरडीएचे प्रकल्प संचालक ए.जी. नवाळे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप झिले, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम आदी उपस्थित होते.

या बैठकीत खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला. पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांची कामगिरी समाधानकारक नाही. बँका जर पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार नसतील तर बँकांची सरफेसी कायद्याखालील प्रकरणांवर जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही केली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी   डॉ. राजेंद्र भोसले  यांनी सांगितले. ज्या राष्ट्रीयीकृत बँकांनी खरीप पीक कर्ज वाटपात समाधानकारक कामगिरी केलेली नाही अशा बँकांनी रब्बी पीक कर्ज वाटपात आता गतीने काम करावे असे, आदेश डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी  सन्मान योजनेतून जिल्ह्यातील किती शेतकर्‍यांना किती रुपयांची कर्जमाफी देण्यात आली, याची माहिती दररोज जिल्हा उपनिबंधकांना सादर करायला हवी. ती माहिती राष्ट्रीयीकृत बँकांनी द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या. मुद्रा योजना आणि स्टँडअप इंडिया योजनेतील कर्जदारांना सर्व बँकांनी त्यांची कागदपत्रे तपासून कर्ज द्यावे. स्टँडअप इंडियात  जिल्ह्यात 660 प्रकरणे करायची होती, पण त्या तुलनेत फारच कमी प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. मुद्रा बँक योजनेत कर्जदारांना बँकेत खाते नसले तरीही कर्ज देण्यात यावे, अशा सूचना भोसले यांनी दिल्या. केंद्र आणि राज्य शासनाच्या घरकुल योजनेत जिल्ह्यात 50 हजार बँक खाती उघडणे अपेक्षित होते, पण अद्याप 36 हजार खाती उघडण्यात आली आहेत. तरी याबाबत कार्यवाही करावी, असे ए.जी. नवाळे यांनी सांगितले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.