Fri, May 24, 2019 03:08होमपेज › Solapur › आचारसंहिता अंमलबजावणी काटेकोरपणे करा : सहारिया

आचारसंहिता अंमलबजावणी काटेकोरपणे करा : सहारिया

Published On: Dec 17 2017 1:32AM | Last Updated: Dec 16 2017 11:09PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी  

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका नि:पक्ष आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज येथे दिल्या. सोलापूर जिल्ह्यात जानेवारी आणि फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणार्‍या 64 ग्रामपंचायतींसाठी येत्या 26 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सहारिया यांनी शनिवारी  जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस आयुक्त महादेव तांबडे, पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त  पोलिस अधीक्षक  निखिल पिंगळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी आदी उपस्थित होते. सहारिया यांनी सांगितले की, ग्रामपंचायतींसाठी होणार्‍या निवडणुकांत आपण नवनवीन प्रयोग करीत आहे. या प्रयोगांना यश येत आहे. यामुळे निवडणूक प्रक्रिया  सुटसुटीत आणि सोपी होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर निवडणूक लढवणार्‍या उमेदवारालाही त्याचा त्रास होणार नाही, याचा विचार केला आहे.

64 ग्रामपंचायतींसाठी होणार्‍या  निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी विविध पथकांनी चोख काम करायला हवे. या पथकांना निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे कामकाज करता यावे यासाठी आवश्यक सोयीसुविधा पुरवा, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी सहारिया यांनी निवडणूक प्रक्रिया सोपी, सुटसुटीत, पारदर्शक कशी करता येईल आणि आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी कशी करता येईल, या मुद्द्यांवर सर्व अधिकार्‍यांशी अनौपचारिक चर्चा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी विजय देशमुख, ज्योती पाटील, स्नेहा उबाळे, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, तहसीलदार संजय पवार, ऋषीकेश शेळके, हनुमंत कोळेकर, दीपक वजाळे आदी उपस्थित होते.