होमपेज › Solapur › सोमवारी सोलापूर बंद; जिल्हा प्रशासन सतर्क

सोमवारी सोलापूर बंद; जिल्हा प्रशासन सतर्क

Published On: Jul 27 2018 11:47PM | Last Updated: Jul 27 2018 11:16PMसोलापूर : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमवार, 30 जुलै रोजी सोलापूर बंदची घोषणा केली असल्याने जिल्हाधिकारी यांनी पोलिस प्रशासनाला यासंदर्भातील सर्वकाही उचित सूचना दिल्या आहेत. बंदच्या आयोजकांनी अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळल्या असून सोमवारचा बंद शांततेत पार पाडावा, असेच आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दै. ‘पुढारी’ प्रतिनिधीशी बोलताना दिली.

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाने गतवर्षी महाराष्ट्रभर शांततेत 58 मूक मार्चे काढून इतिहास घडवला होता; परंतु वर्षभरातदेखील मराठा समाजाची आरक्षणासह एकही मागणी मान्य झाली नसल्या कारणाने काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठोक मोर्चाचे आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच ठिकाणी निघालेल्या ठोक मोर्चांना हिंसक वळण लागले आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सोमवारी सोलापूर बंदची घोषणा केली आहे. सोमवारच्या बंददरम्यान काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाने काही तयारी केली आहे का यासंदर्भात विचारणा केली असता निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांनी सांगितले की, शैक्षणिक शुल्कासंदर्भात नुकतेच मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. त्यावेळी बंदबाबत जिल्हाधिकारी यांची बंदच्या आयोजकांशी चर्चा झाली आहे. बंदच्या आयोजकांनी बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत.

सोमवारच्या सोलापूर बंद पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी पोलिस प्रशासनाशी चर्चा करुन सर्वोपतरी सूचना दिलेल्या आहेत. सोमवारी पुकारण्यात आलेला बंद शांततेच्या मार्गाने पार पाडावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने मोर्चेकर्‍यांना करण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास उद्या किंवा परवादेखील जिल्हाधिकारी सर्व यंत्रणांची बैठक घेऊ शकतात, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली. शुक्रवार, 27 जुलै रोजी जिल्हाधिकारी आणि अतिरिक्‍त जिल्हाधिकारी हे शासकीय कामानिमित्त पंढरपूर दौर्‍यावर होते.