Wed, Jul 17, 2019 18:07होमपेज › Solapur › अस्मिता योजनेंतर्गत 25 हजार  पाच रुपयात मिळणार नॅपकीन 

अस्मिता योजनेंतर्गत 25 हजार  पाच रुपयात मिळणार नॅपकीन 

Published On: Mar 25 2018 1:40AM | Last Updated: Mar 24 2018 9:20PMसोलापूर : प्रतिनिधी

ग्रामविकास खात्याकडून सुरु करण्यात आलेल्या अस्मिता योजनेंतर्गत ग्रामीण भागातील 25 हजार शाळांतील मुलींना फक्‍त पाच रुपयांत सॅनटरी नॅपकीन देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यासाठी सुमारे पाचशे बचत गट विक्रीसाठी दुवा ठरणार असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांनी दिली.  अस्मिता योजनेंतर्गत मासिक पाळी व स्वच्छतेचे महत्त्व किशोरींना व महिलांना पटवून देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

मनात असलेली अनामिक भीती, अबोला व अस्वच्छ कपड्यांच्या वापरामुळे होणार्‍या आरोग्यावरील परिणामाबाबत व्यापक जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत आहे. जि.प. शाळेतील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका व महिला बचत गटांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य घेण्यात येत आहे. जिल्ह्यात 1 हजार 29 ग्रामपंचायत असून प्रत्येक गावात अस्मिता योजना सुरु करण्याचा प्रयत्न होत आहे.

या योजनेतील महिला व मुलींसाठी अस्मिता कार्ड देण्यात येत आहे. या कार्डाच्या नोंदीनुसार बचत गटांना अस्मिता पॅडचा पुरवठा करण्यात येणार आहे. मुलींसाठी केवळ 5 रुपयांत पॅड देण्यात येत असून यासाठी बचत गटास एक रुपया देण्यात येत आहे. महिलांसाठी 24 व 29 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. यासाठी बचत गटांना पाच रुपये मोबदला देण्यात येत आहे.  जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच सर्व प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना या योजनेची माहिती देण्यात आली.

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नवाळे यांनी योजनेची सविस्तर माहिती देत या योजनेत 11 ते 19 वयोगटातील शाळेतील सर्व मुलींची नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी त्रिवेणी भोंदी आदींनीही मार्गदर्शन केले. या योजनेंतर्गत तालुकानिहाय नोंदणी झालेल्या मुलींची आकडेवारी पुढीलप्रमाणे असून या मुलींसाठी केवळ पाच रुपयांत अस्मिता नॅपकीन पुरविण्यात येत आहे. अक्‍कलकोट : 3981, बार्शी : 1172, करमाळा : 1824, माढा : 2170, माळशिरस : 4211, मंगळवेढा : 1505, मोहोळ : 2468, पंढरपूर : 1526 , सांगोला : 1710, उत्तर सोलापूर : 1342, दक्षिण सोलापूर : 3212.
 

 

tags : Solapur,news,asmita, under, scheme ,napkin, five, rupees,