Thu, Mar 21, 2019 11:07होमपेज › Solapur › शिवजयंतीनिमित्त भुईकोट किल्ल्यातील भिंती ‘अक्षर’मुक्‍त 

शिवजयंतीनिमित्त भुईकोट किल्ल्यातील भिंती ‘अक्षर’मुक्‍त 

Published On: Feb 19 2018 1:19AM | Last Updated: Feb 18 2018 11:23PM सोलापूर : प्रतिनिधी

ऐतिहासिक स्थळांजवळ काहीजण आपल्या प्रिय व्यक्‍तींचे नाव लिहून अशा स्थळ वा वास्तूंचे एकप्रकारे विद्रुपीकरण करण्याचा घृणास्पद प्रकार करतात. सोमवारी होणार्‍या शिवजयंतीचे औचित्य साधून सोलापुरातील विविध सामाजिक संघटनांनी भुईकोट किल्ल्यातील भिंती ‘अक्षर’मुक्‍त करून या किल्ल्याचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील पुरातन किल्ले, गड आदी ऐतिहासिक ठेवांविषयी प्रत्येकालाच अभिमान असायला हवा. कारण या वास्तू इतिहासाची साक्ष तर देतातच, शिवाय नवीन पिढीला प्रेरणाही देतात. राज्य, देशात कुठेही जा, ऐतिहासिक वास्तूंच्या भिंतींचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसून येते.

प्रेमवेडे मंडळी आपल्या ‘प्रिय’ व्यक्‍तीचे नाव किल्ल्यातील भिंतींवर लिहिण्याचा एकप्रकारे लोकांच्या द‍ृष्टीने ‘अप्रिय’ प्रकार करतात. अशा किल्ल्यांचे पावित्र्य जपण्याची गरज निर्माण झाली आहे. हे लक्षात घेऊन तसेच शिवजयंतीचे औचित्य साधून सोलापुरातील इंटॅक सोलापूर, इको नेचर, संभाजी ब्रिगेड, रोटरॅक्ट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ, जिजाऊ ब्रिगेड, शिवशाहू, सक्षम, मानवाधिकार संस्था, वन्यजीव संस्था, अपरिचित संस्था,  नेचर कॉन्झरवेशन सर्कल आदी विविध संघटनांच्या सुमारे 150 कार्यकर्त्यांनी एकत्र येत भुईकोट किल्ल्यातील भिंती ‘अक्षर’मुक्‍त करण्याचा अभिनव उपक्रम रविवारी राबविला. 

रविवारी सकाळी 8 वाजता या आगळ्यावेगळ्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. पुरातत्व विभागाच्या सहकार्याने शिव व निसर्ग प्रेमींनी एकत्र येऊन किल्ल्याच्या दगडी भिंतीवरील खडू व चुन्याने लिहिलेली नावे, चित्र पाणी व कापडाच्या सहाय्याने पुसण्यास सुरुवात केली. दिवसभरात सुमारे 200 नावे पुसून काढण्यात आली. इको नेचर संघटनेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मोहिमेत सहभागी झालेल्यांना निसर्ग दिनदर्शिका इकोनेचर  संस्थेकडून पुरातत्व विभाग प्रमुख हरि दसरे यांच्या हस्ते भेट देण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडकडून जिजाऊ चरित्र पुस्तक भेट देण्यात आली.

यावेळी  नितीन अणवेकर, दत्ता म्हेत्रे, सीमा चाफळकर, भीमाशंकर दर्गोपाटील, पल्लवी चवरे, विठ्ठल इरकशेट्टी, विकास शिंदे, तिपय्या हिरेमठ, हिंदुराव गोरे, मयुर गवते, अभिंजली जाधव, पप्पू जमादार, हिरेमठ, प्रशांत हिबारे, मुकुंद शेटे, ऋषिकेश पवार, महेश कासट, बसवराज जमखंडी, शाम कदम, विनय गोटे, मनोज देवकर आदी उपस्थित होते. शेवटी गणपती घाट किल्ल्याच्या मागे वृक्षारोपणही करण्यात आले.
 

जिल्ह्यात फक्‍त शिवजयंतीचे भगवे वादळ

सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात तसेच सोलापूर शहरातील वातावरण सध्या शिवजयंतीमुळे भगवे झाले असून, ठिकठिकाणी शिवजयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांचे तसेच अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहरात दुपारनंतर भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले असून, मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात होती.