होमपेज › Solapur › सेसफंडात अध्यक्ष, सभापतींना झुकते माप

सेसफंडात अध्यक्ष, सभापतींना झुकते माप

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 11:52PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद सेसफंडाची रक्‍कम सर्वच सदस्यांना समान निधीत वाटप करणे अपेक्षित असताना जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे आणि बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत सर्वाधिक निधी आपल्या तालुक्याकडे वळविला असून यामध्ये काही सदस्यांनी प्रश्‍न उपस्थित केला असताना या निधीला विरोध कराल, तर इतर योजनांमध्ये माझा अधिकार वापरेन, अशी धमकीवजा विनंती जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी सभागृहात केली. त्यामुळे सभागृहातील सदस्यांनी यावर बोलणेच टाळले.

जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्‍नातून मिळाणार्‍या निधीतून विविध तालुक्यांत अनेक विकासकामे हाती घेतली जातात. यामध्ये प्रत्येक सदस्याला समान निधी मिळावा, अशी अपेक्षा होती. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी 57 लाख रुपये माढा तालुक्याला नेले, तर बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी यापैकी 90 लाख रुपये मोहोळ तालुक्याला नेले. त्यामुळे या निधी वाटपात  विसंगती असून दोन तालुक्याला अधिक निधी गेल्याचा मुद्दा मोहिते-पाटील गटाच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. यावर जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील,  विरोधी पक्षनेते बळीरामकाका साठे आणि सुभाष माने यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केला. यावेळी अध्यक्ष संजय शिंदे चांगलेच आक्रमक झाले. यामध्ये सभापती आणि अध्यक्ष म्हणून मला या निधीपैकी 15 टक्के रक्‍कम अधिक वापरण्याचा अधिकार असल्याने तो निधी मी तालुक्यातील कामांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सदस्यांना विश्‍वासात घेऊन हा निर्णय मी घेतलेला आहे तसेच मी यामध्ये नैतिकताही जपली आहे. त्यामुळे इतर सदस्यांनी याला विरोध करू नये. जर या निर्णयाला आपला विरोध असेल तर मग इतर योजनामंध्येही मी माझ्या अधिकाराचा पूर्ण वापर करेन, असा इशारा दिला. त्यामुळे सर्वच सदस्य यावर गप्प झाले.