Sun, Mar 24, 2019 12:25होमपेज › Solapur › तणावमुक्‍तीसाठी मानसिक आरोग्य जपा : डॉ. मंझा

तणावमुक्‍तीसाठी मानसिक आरोग्य जपा : डॉ. मंझा

Published On: Feb 05 2018 11:00PM | Last Updated: Feb 05 2018 8:56PMसोलापूर : प्रतिनिधी

आधुनिक काळात प्रचंड यांत्रिक प्रगती झाली आहे. त्यातून माणसाचे जगणेच बदलून गेले आहे. मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या स्पर्धेचा परिणाम थेट माणसाच्या मानसिक आरोग्यावर झाला आहे. त्या  मानसिक  ताण-तणावातून मुक्ती मिळवत मानसिक आरोग्य जपा, असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी केले. 

संगमेश्‍वर महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभाग आणि इंडियन असोसिएशन ऑफ मेंटल हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मॉडर्न लाईफ अ‍ॅण्ड मेंटल हेल्थ’ या विषयावर नुकतीच दहावी राष्ट्रीय परिषद आयोजिली होती. त्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. डी. पुजारी हे होते. यावेळी मंचावर आयएएमएचचे संचालक डॉ. पी. ए. भागवतवार, डॉ. सी. जी. देशपांडे, डॉ. ए. पी. शुक्ला आदी उपस्थित होते.

पुढे डॉ. मंझा म्हणाले, आधुनिक काळात प्रत्येक क्षेत्रात ताणतणाव वाढत आहे. त्यामुळे एकूणच समाजाचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. हा ताणतणाव कमी करण्यासाठी पहिल्यांदा स्वत:ला समजून घेण्याची गरज आहे. दुसर्‍याशी तुलना करण्यापेक्षा स्वत:च्या क्षमता ओळखून नियोजन केल्यास प्रत्येक कामात यश मिळवता येते. 

डॉ. भागवतवार म्हणाले,  मानवी जीवनात मनाला समजावून घेताना  वर्तनाचा विचार संकल्पनात्मकपणे लक्षात घ्यायला हवे. त्यातूनच आजच्या काळातील मानसिक समस्या आपण सोडवू शकू.
प्राचार्य डॉ. पुजारी म्हणाले, सध्या शैक्षणिक क्षेत्रातही मानसिक ताणतणाव वाढला आहे. त्यामुळे याबाबत विद्यार्थ्यांनी हा ताणतणाव कमी करुन मानसिक आरोग्य जपण्यासाठी आवर्जुन प्रयत्न केले पाहिजेत.
पाहुण्यांचा परिचय डॉ. सुचित्रा पाटणकर यांनी करुन दिला. सूत्रसंचालन प्रा. नागेश खराडे, प्रा. शिवराज देसाई यांनी केले. डॉ. पी. एस. बनसोडे यांनी आभार मानले. या परिषदेला पुणे, मुंबई, बेळगाव, गुलबर्गा येथील अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.