होमपेज › Solapur › सरकारवर विश्‍वास नाही, मंजूर आठ मागण्यांचा काढा जीआर : प्रा. धोंडे 

सरकारवर विश्‍वास नाही, मंजूर आठ मागण्यांचा काढा जीआर : प्रा. धोंडे 

Published On: May 29 2018 1:27AM | Last Updated: May 29 2018 12:19AMसोलापूर : प्रतिनिधी  

सोलापूर विद्यापीठ  नामांतरप्रकरणी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा न्यायालयाचा निर्णय असतानाही शिक्षणमंत्री विनोद तावडे घाई करीत आहेत. अगोदर आमच्या मंजूर मागण्यांचा अध्यादेश काढून त्यानुसार अंमलबजावणी करावी, अशी मागणी करीत कोणत्याच सरकारवर आपल्याला विश्‍वास नसल्याचे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. 

सोलापूर विद्यापीठ स्थापनेपासून विद्यापीठास श्री सिद्धेश्‍वरांचे नाव देण्याची मागणी शिवा संघटनेने लावून धरली आहे. मात्र धनगर समाजानेही पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव पुढे केले. धनगर, वीरशैव हे दोन्हीही शिवपूजक असून एकमेकांचे गुरूबंधू आहेत. त्यामुळे दोन्ही समाजात सकारात्मक चर्चा घडवून चांगला निर्णय झाला होता. 

विद्यापीठ नामांतराची मागणी ज्या समाजाची मान्य होईल, ते मान्य असून  दुसर्‍या समाजाच्या पाच मागण्या मान्य करण्याचा प्रस्ताव मंत्रालयात ठेवला. त्यानुसार पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याचे मान्य केले. त्यानुसार वीरशैव समाजाने बोरामणी येथील विमानतळास महात्मा बसवेश्‍वर विमानतळ असे नाव देणे, सोलापूर रेल्वेस्टेशनला श्री सिद्धेश्‍वर रेल्वे टर्मिनस नाव द्यावे, राज्यातील वीरशैव लिंगायत समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य करुन आर्थिक विकास करण्यासाठी 1978 च्या कंपनी कायद्यान्वये महात्मा बसवेश्‍वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन प्रत्येक वर्षाला दहा कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करणे, प्रतीवर्षी अक्षय्य तृतीया, महात्मा बसवेश्‍वर जयंतीला दलितमित्र पुरस्काराच्या धर्तीवर महात्मा बसवेश्‍वर सामाजिक समता शिवा पुरस्कार द्यावा, मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्‍वर यांचे राष्ट्रीय स्मारकाचे कृषी विभागाच्या 62 एकर जमिनीवरील काम त्वरित सुरू करावे, नववी, दहावी अभ्यासक्रमात बसवेश्‍वरांच्या जीवनावरील धडे समाविष्ट करावे, राज्यातील सर्व विद्यापीठात महात्मा बसवेश्‍वर अध्यासन केंद्राची स्थापना करावी, मुस्लिमांच्या वक्फ बोर्डाप्रमाणे महाराष्ट्र वीरशैव लिंगायत बोर्ड स्थापन करावे, अशा आठ मागण्या मंत्रालयातील बैठकीत ठेवल्या. त्यास मंत्री तावडेंनी 19 मे रोजी मागण्या मंजूर केल्या. 

मागण्या मंजूर झाल्या तरी आमचा अंतिम निर्णय झाला नव्हता. तरीही तावडेंनी घाई करुन विद्यापीठ नामांतराची तारीख जाहीर केली. त्यामुळे आम्ही 16 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावर आता स्थगितीचा निर्णय झाला आहे. त्यामुळे या सरकारने आमच्या मंजूर मागण्यांचा अध्यादेश काढून त्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्रा. धोंडे यांनी केली. 

यावेळी शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष बसवराज बगले, शहराध्यक्ष संतोष केंगनाळकर, वीरभद्रेश बसवंती, उमाकांत शेटे, अरविंद पाटील, मनीष काळजे, अप्पू एनशेट्टी, शिवराज कमलापुरे, चंद्रशेखर भरले, महांतेश पाटील यांची उपस्थिती होती.