Thu, Jun 27, 2019 11:59होमपेज › Solapur › सोलापूर : २ मुलींनीच केली आई, भाऊ-बहिणीची हत्या

सोलापूर : बेपत्ता दोन मुलींनीच केले तिहेरी हत्याकांड

Published On: Apr 09 2018 5:27PM | Last Updated: Apr 09 2018 5:43PMसोलापूर : प्रतिनिधी

संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणार्‍या तिर्‍हे येथील एकाच कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या निर्घृण हत्याकांडप्रकरणी त्याच कुटुंबातील बेपत्ता झालेल्या दोघी मुलींना अटक करण्यात आली आहे. या दोघींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पसंत नसलेल्या मुलांशी लग्‍नाचा तगादा लावल्याने व  घरातील व्यक्‍तींकडून किरकोळ कारणावरून होत असलेल्या त्रासापासून मुक्‍त होण्यासाठी हे हत्याकांड केल्याची कबुली या दोघींनी दिली आहे.

धुना रणसोड जाधव (वय 20) आणि वसन रणसोड जाधव (19, दोघी रा. भोयका, ता. लिंबडी, जि. सुरेंद्रनगर, गुजरात सध्या तिर्‍हे, ता. उत्तर सोलापूर) अशी पोलिस कोठडी मिळालेल्या मुलींची नावे आहेत. हतयबाई रणसोड जाधव (50), लाखी रणसोड जाधव (22), मफा रणसोड जाधव (17) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. 

शुक्रवारी (6 एप्रिल) दुपारी तिर्‍हे येथील सिद्धनाथ साखर कारखान्याशेजारील तलावाशेजारी राहणार्‍या रणसोड जाधव यांच्या कुटुंबातील त्यांची पत्नी हतयबाई, मुलगी लाखी आणि मुलगा मफा या तिघांच्याही डोक्यात अज्ञात व्यक्‍तीने  लोखंडी पहारीने मारहाण करून  त्यांचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. यावेळी याच कुटुंबातील मुलगी धुना व वसन या दोघींही बेपत्ता झाल्याचे आढळून आल्याने याबाबत सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करून दोन मुली गायब झाल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. त्यातच मृतांच्या नातेवाइकांनी बेपत्ता मुलींचा शोध लागल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. 

अखेर पोलिसांच्या आश्‍वासनामुळे नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. त्यामुळे या गुन्ह्याची उकल होणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान होते.

पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलिस उपविभागीय अधिकारी अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर नावंदे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील मिळून 20 अधिकारी-कर्मचार्‍यांचे पथक तपासासाठी पाठविले होते.

पोलिसांचा  तपास सुरू असतानाच रविवारी सकाळी बेपत्ता मुली या तुळजापूर येथे आल्याची माहिती सोलापूर ग्रामीण  पोलिसांना मिळाल्याने पोलिसांचे एक पथक तुळजापूर येथे गेले. तुळजापूर बसस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये या दोन्ही मुली सकाळी 11 च्या सुमारास एस. टी. बस क्रमांक एमएच 14  बीटी 1026 तुळजापूर-पुणे या बसमधून पुण्याकडे गेल्याचे दिसून आले. त्यावेळी पोलिसांनी तातडीने हालचाली करून त्या एस.टी. बसचे चालक बी. व्ही. मुंढे व चालक सूरज डोईफोडे यांचे मोबाईल नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला. या दोन्ही मुलींचे  फोटो मोबाईलवर पाठवून त्याच प्रवास करीत असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी चालकाला एस.टी. बस ही यवत पोलिस ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार चालक मुंढे यांनी एस.टी. बस यवत पोलिस ठाण्यात नेली व त्याठिकाणी यवत पोलिसांनी एस. टी. बसमधून दोघींना ताब्यात घेतले. तोपर्यंत पाठीमागून गेलेल्या सोलापूर ग्रामीणच्या पथकाने दोघींना ताब्यात घेऊन रात्री उशिरा सोलापुरात आणले. 

सोलापुरात  आणल्यानंतर  या दोन्ही मुलींकडे  चौकशी करण्यात आल्यानंतर त्या दोघींनी या हत्याकांडाची कबुली दिली. गेल्या अनेक वर्षांपासून वडील, आई, भाऊ व बहीण हे लहान-सहान कारणावरून या दोघींना सतत मारहाण करीत होते. तसेच पसंत नसलेल्या ठिकाणी लग्न करून घे म्हणून मागे लागले होते. मुलींना ती स्थळे पसंत नसल्याने व घरातील लोकांच्या सततच्या त्रासाला कंटाळूनच शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास दोघींनी लोखंडी पहारीने तिघांच्याही डोक्यात जबर वार करून त्यांचा खून केला व लगेच त्या बसने सोलापूर व तेथून अंबेजोगाईला गेल्याचे दोघींनी सांगितले. घटनेच्या आदल्या दिवशी भाऊ मफा याने पाणी आणण्यास उशीर झाल्याने धुनाला काठीने मारहाण केली होती, त्यावेळी धुनाने तुला 24 तासात मारते, अशी धमकी दिल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिस अधीक्षक प्रभू यांनी सांंगितले.

गुन्हा केल्यानंतर या दोघीही बसने सोलापुरात आल्या व सोलापुरातून अंबाजोगाई येथे असलेल्या धुनाच्या प्रियकराकडे गेल्या. त्याठिकाणाहून रविवारी सकाळी निघाल्या व तुळजापूरच्या जवळपास आल्यानंतर तिने एस.टी.तील एका प्रवाशाकडील मोबाईल घेऊन वडील रणसोड जाधव यांना मोबाईलवर फोन करून आपल्याला काही लोकांनी पकडून ठेवल्याचे सांगितले. वास्तविक तिच्याकडे मोबाईल असून तो तिने बंद केला होता.

हा  फोन  झाल्यानंतरच  पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या आणि अत्यंत शिताफीने याचा तपास व समन्वय करून दोघींना गुजरातला पळून जाताना एस.टी. बसमधून ताब्यात घेऊन  अटक केली. या गुन्ह्यात भावाला एकीने, तर बहिणीला दुसरीने मारले व आईला दोघींनीही मिळून मारल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक उमेश धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक बाबुराव म्हेत्रे, हेमंत बंगाळे, हवालदार नारायण गोलेकर, मल्लिनाथ चडचणकर, संदीप काशीद, संभाजी खरटमल, विजयकुमार भरले, मारुती रणदिवे, विवेक सांजेकर, सचिन वाकडे, दिलीप राऊत, महिला पोलिस हवालदार अनिता काळे, पोलिस नाईक रवि माने, बाळू चमके, लालसिंग राठोड, आसिफ शेख, सागर शिंदे, अमोल गावडे, सचिन गायकवाड, गुंडाप्पा सुरवसे, ईस्माईल शेख यांनी केली.

Tags : solapur, solapur news, tirhe murder case, solapur triple murder case