Thu, Nov 15, 2018 12:23



होमपेज › Solapur › जुगार खेळणार्‍या सहायक फौजदार,  तीन कर्मचार्‍यांसह 11 जणांवर गुन्हा

जुगार खेळणार्‍या सहायक फौजदार,  तीन कर्मचार्‍यांसह 11 जणांवर गुन्हा

Published On: Mar 25 2018 1:40AM | Last Updated: Mar 24 2018 10:39PM



सोलापूर : प्रतिनिधी

न्यू पाच्छा पेठेतील पांडुरंग भीमराव जाधव याच्या वाड्यात असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर गुन्हे  शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. यावेळी जुगार खेळणार्‍या सहायक फौजदार, 3 पोलिस कर्मचार्‍यांसह 7 जणांना ताब्यात घेऊन पळून गेलेल्या 3 व्यक्‍तींसह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. वळसंग  पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार अल्लाबक्ष सत्तार सय्यद (वय 56, रा. रविवार पेठ, बोरामणी नाका चौकाजवळ, सोलापूर), कामती पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक भरत देवू बागल (ब. नं. 1823, वय 30, रा. न्यू पाच्छा पेठ, अशोक चौक, सोलापूर), वैराग पोलिस  ठाण्याचे पोलिस नाईक रशीद अब्दुल शेख (ब. नं. 1775, वय 32, रा. वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर), सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक  राजशेखर शिवप्पा कटारे (ब. नं. 1017, वय 49, रा. राघवेंद्रनगर, सैफुल, सोलापूर) यांच्यासह संतोष सुरेश मुदगल 

(वय 24, रा. न्यू पाच्छा पेठ, सोलापूर), मदन श्रावन बेलभंडारी (वय 30, रा. न्यू पाच्छा पेठ, अशोक चौक, सोलापूर) अशी  ताब्यात  घेतलेल्यांची  नावे असून जुगार अड्डा चालक रमशे पांडुरंग  जाधव   आणि पळून गेलेल्या 3 अनोळखी व्यक्‍तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील  सर्व  प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांनी सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी  व  शहर  गुन्हे  शाखेच्या अधिकार्‍यांना दिले आहेत.  शुक्रवारी  रात्री  पोलिस आयुक्‍त तांबडे  यांना अशोक चौकातील मस्ताना हॉटेलच्या मागे राहणार्‍या पांडुरंग भीमराव जाधव याच्या वाड्यामधील खोलीत जुगार अड्डा  चालविला जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून त्यांनी  कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकार्‍यांना सांगितले.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास वाड्यातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी वरील पोलिस कर्मचारी  हे अंदर-बाहर जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांची कारवाई होत असताना जुगार अड्ड्यातून 3 जण पळून गेले. यावेळी  गुन्हे  शाखेच्या पोलिसांनी जुगार अड्ड्यातून रोख 410 रुपये, पत्त्याचा डाव असे  साहित्य  जप्त  केले.  हा  जुगार अड्ड्ा पांडुरंग जाधव हा चालवित असल्याचे निष्पन्न झाले असून याबाबत गुन्हे शाखेचे  पोलिस हवालदार संजय बायस यांच्या फिर्यादीवरुन जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.
 

 

tags ; Solapur,news,city, crime, branch, raided,gambling, area,