होमपेज › Solapur › सोलापूर : मोहोळमध्ये पुतळ्याची विटंबना झाल्याने तणाव

सोलापूर : मोहोळमध्ये पुतळ्याची विटंबना झाल्याने तणाव

Published On: Aug 04 2018 5:08PM | Last Updated: Aug 04 2018 4:33PMमोहोळ : वार्ताहर

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेची बेकायदा जमाव जमवून  विटंबना केल्याची घटना मोहोळ तालुक्‍यातील पोखरापूर येथे घडली आहे. ही घटना ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सहा वाजता घडली. या प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोखरापूर (ता.मोहोळ) येथील खंदारे वस्ती चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे स्टेज आहे. शुक्रवारी ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते साडे सहा वाजण्याच्या दरम्यान प्रशांत तुकाराम भोसले, समाधान तुकाराम भोसले, अविनाश दिगंबर डोंगरे, अविराज मोहन नाईकनवरे, युवराज शशिकांत झांबरे, लक्ष्मण झांबरे, ज्ञानेश्वर गोरख दळवे, सौदागर नारायण भोसले, धनराज भोसले, मोहन नाईकनवरे, आनंद भोसले हे त्या ठिकाणी आले. त्यावेळी त्यांनी सागर खंदारे यांना जातीवाचक शिवीगाळ केली, महिलांना ओढाओढा करुन त्यांच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना देखील केली. 

या प्रकरणी सागर खंदारे यांनी मोहोळ पोलिसात तक्रार दाखल केल्याने अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सहा आरोपींना गजाआड केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक खांडवी हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

घटना घडल्याचे माहित होताच संपूर्ण तालुक्यातीत मातंग बांधवांनी मोहोळ पोलिस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. तत्पुर्वी पोलिस उप अधीक्षक खांडवी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. तसेच काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोखरापूर येथे पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.