Tue, Jul 16, 2019 21:47होमपेज › Solapur › सोलापूर : व्यापार्‍यांना गाळ्याबाहेर काढून दाखवाच!

सोलापूर : व्यापार्‍यांना गाळ्याबाहेर काढून दाखवाच!

Published On: Jul 09 2018 11:07PM | Last Updated: Jul 09 2018 11:07PMसोलापूर : प्रतिनिधी 

गेल्या 30-40 वर्षांपासून व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांना त्यांच्या गाळ्यातून काढून आमचा संसार उद्ध्वस्त करू नका. कारण जर एकदा जनता खवळली तर महापालिकेला आग लावायला मागेपुढे पाहणार नाही, अशा शब्दांत माजी आमदार नसरय्या आडम यांनी सोमवारी व्यापारी संघर्ष मोर्चात महापालिका आयुक्त आणि सत्ताधार्‍यांवर हल्लाबोल केला.

महापालिकेने भाड्याने दिलेल्या ज्या गाळ्यांची मुदत संपली ते गाळे भाडेवाढ करून आहे त्याच व्यापार्‍यांना द्यावे, या मागणीसाठी व्यापार्‍यांनी महापालिकेवर मोर्चा काढला होता. सुमारे पाच हजार लोकांनी यात सहभाग नोंदविला. व्यापार्‍यांच्या दुकानातील कामगार महिला व घरातील काही महिला सदस्यांचा या मोर्चातील यात सहभाग लक्षवेधी ठरला. मोर्चा महापालिकेवर धडकल्यावर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. त्यावेळी माजी आमदार आडम यांच्यासह सर्वच पक्षांच्या नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी महापालिकेतील सत्ताधारी, आयुक्त, पालकमंत्री, सहकारमंत्री यांच्यावर कडाडून टीका केली. 

आडम म्हणाले की, ज्या गाळ्यांवर व्यापार्‍यांची उपजीविका आहे तेच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला आहे. गाळेधारक काय पाकिस्तानातून आले आहेत का,  पाकिस्तानशी लढताना सीमेवर कित्येक जवान शहीद होत असताना त्याच पाकिस्तानातून हे सरकार साखर घेऊन येत आहे. मात्र, इथल्या व्यापार्‍यांची उपजीविकेचे साधन हिरावून घेत आहे. मात्र, इथला व्यापारी खवळला तर आयुक्तांना सोलापुरात राहणे मुश्कील होऊन 
जाईल.  

11 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलावले नाही तर 12 तारखेला सोलापूर बंद करू आणि ते असे बंद करू की त्याचे पडसाद थेट नागपूरमध्ये सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात गाजेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक मुळीक,  माजी आमदार दिलीप माने, काँग्रसेचे गटनेते चेतन नरोटे, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव, राष्ट्रवादी शहराध्यक्ष भारत जाधव, नगरसेवक देवेंद्र कोठे, अमोल शिंदे, माजी महापौर मनोहर सपाटे, काँग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले, महिला आघाडी अध्यक्षा हेमा चिंचोळकर आदी उपस्थित होते.