Tue, Jul 23, 2019 01:57होमपेज › Solapur › सावंतांच्या प्रयत्‍नांना यश, सोलापूर शिवसेनेत मनोमिलन 

सावंतांच्या प्रयत्‍नांना यश, सोलापूर शिवसेनेत मनोमिलन 

Published On: Dec 17 2017 7:51PM | Last Updated: Dec 17 2017 7:51PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवावी, या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे यांच्या मागणीनंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे-बरडे यांच्यात निर्माण झालेल्या वादावर रविवारी संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांनी पडदा टाकला. यावेळी बरडे यांनी कोठे यांच्यासमवेत काम करणार असल्याचे स्पष्ट केले, तर आगामी निवडणूक सेनेतर्फेच लढवू, अशी ग्वाही कोठे यांनी दिली. 

मंगळवारी बरडे यांनी  शिंदे यांची भेट घेऊन आगामी निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. कोठे व बरडे यांच्यात वाक्युद्धही रंगले. या वादाची दखल घेत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आ. तानाजी सावंत यांनी कोठे-बरडे यांना रविवारी पुण्याला बोलावून घेतले. यावेळी या तिघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. यावेळी आ. सावंत यांनी कोठे-बरडे यांना यापुढील काळात एकत्रितपणे पक्षाचे काम मोठ्या जोमाने करण्याची सूचना केली. एवढेच नव्हे, आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीनिशी काम करण्यास सांगितले. जानेवारीनंतर शहर-जिल्ह्याचा दौरा करुन पक्ष मजबुतीचे प्रयत्न आपण करणार असल्याचे आ. सावंत यावेळी सांगितले. बूथनिहाय यंत्रणा राबविण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. 

या चर्चेप्रसंगी बरडे यांनी कोठे यांच्यासमवेत पक्षाचे काम करणार असल्याचे आ. सावंत यांना सांगितले, तर कोठे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच आपण आगामी विधानसभेची निवडणूक लढविण्याची ग्वाही दिली. शहर उत्तर असो वा शहर मध्य विधानसभा मतदारसंघ यापैकी कुठल्याही मतदारसंघात महेश कोठे उभारले तरी त्यांच्या पाठिशी राहून आपण सेनेचे काम करु. असेही यावेळी बरडे म्हणाले.

चव्हाण यांनी व्यक्त केली दिलगिरी 
शिंदे यांची भेट घेऊन निवडणूक लढविण्याच्या मागणीबाबत बरडे यांच्यावर टीकेची झोड उठविणार्‍या शहर प्रमुख प्रताप चव्हाण यांना संपर्क  प्रमुख आ. सावंत यांनी मोबाईलवर संपर्क साधला. यापुढे कोठे-बरडे यांच्यासमवेत मिळून काम करा, अशी सूचना करतानाच आ. सावंत यांनी चव्हाण यांना केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले. त्यानुसार चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. आपला रोख बरडे यांच्याविषयी नव्हता, तर काँग्रेसविरोधात होता, असे सांगत चव्हाण यांनी यापुढे कोठे-बरडेंच्या खांद्याला खांदा लावून पक्षाचे काम करणार असल्याचे सांगितले.