Wed, May 22, 2019 16:24होमपेज › Solapur › शिवसेना नगरसेवकाच्या पत्नीसह तीन महिलांना कर्नाटकात अटक

शिवसेना नगरसेवकाच्या पत्नीसह तीन महिलांना कर्नाटकात अटक

Published On: Mar 12 2018 10:41PM | Last Updated: Mar 12 2018 10:24PMसोलापूर : प्रतिनिधी

शहरातील शिवसेना नगरसेवकाच्या   पत्नीसह   तीन  महिलांना कर्नाटक पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात रंगेहाथ अटक केली. या तीनही महिलांना सोलापुरात आणून कर्नाटक पोलिसांनी विविध सराफांकडून सुमारे 20 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

उषा  खांडेकर,  मीना  बजरंग जाधव आणि तिपव्वा लक्ष्मण ऊर्फ काका जाधव (रा. सेटलमेंट, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. तिपव्वा जाधव ही महिला सोलापुरातील शिवसेनेचे नगरसेवक लक्ष्मण जाधव यांची पत्नी आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील दावणगिरी येथे एका मंदिरामध्ये गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करीत असताना उषा खांडेकर, मीना बजरंग जाधव आणि तिपव्वा लक्ष्मण ऊर्फ काका जाधव या तीनही महिलांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. या तीनही महिला सध्या कर्नाटक पोलिसांच्या कोठडीत आहेत.

या तीनही महिला मूळच्या सोलापूरच्या असल्याने या महिलांनी कर्नाटकात अनेक गुन्हे करून त्यात चोरलेले सोन्याचे दागिने सोलापुरातील सराफांना विकल्याचे सांगितले असल्याने कर्नाटक पोलिस या तीनही महिलांना घेऊन सोलापुरात आले आहेत. शहर गुन्हे शाखेच्या मदतीने कर्नाटक पोलिसांनी या महिलांच्या सांगण्यावरून ज्या सराफांना चोरलेले सोन्याचे दागिने विकले आहेत, अशा सराफांकडे चौकशी करून त्यांना ताब्यात घेऊन सुमारे  20  तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. 

गेल्या कित्येक दिवसांपासून या तीनही महिला कर्नाटकातील विविध मंदिरांमध्ये गर्दीचा  फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरत होत्या. दागिने चोरल्यानंतर या महिला हे दागिने सोलापुरातील लक्ष्मण जाधव याच्याकडे विक्रिसाठी आणून देत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांकडून नगरसेवक लक्ष्मण जाधव यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे कर्नाटक पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे कर्नाटक पोलिसांचा या महिलांकडे कसून तपास  सुरू  असून या महिलांकडून अजूनही  अनेक  गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.