Tue, Apr 23, 2019 19:43होमपेज › Solapur › सौरऊर्जेने झळाळणार सोलापूर रेल्वे!

सौरऊर्जेने झळाळणार सोलापूर रेल्वे!

Published On: Sep 10 2018 11:18PM | Last Updated: Sep 10 2018 11:18PMसोलापूर : प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या सोलापूर डिव्हिजनमध्ये 2.13 मेगावॅट सौरऊर्जेचे काम लवकरच प्रारंभ केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ विद्युत अभियंता व्ही. के. सिंग यांनी दिली. यामुळे विविध रेल्वेस्थानकांत व वर्कशॉपच्या ठिकाणी सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे सोलापूर मध्य रेल्वे विभागात 10 टक्के विजेची बचत होणार आहे.

मध्य रेल्वेमध्ये सोलापूर, पुणे, नागपूर, भुसावळ, मुंबई असे पाच विभाग (डिव्हिजन) आहेत. या पाचही विभागांत 10 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्पाचे काम केले जाणार आहे. सोलापूर मध्य रेल्वे विभागामध्ये 2.13 मेगावॅट क्षमतेची सौरऊर्जा प्रणाली लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे. या कामाचा ठेका दोन खासगी कंपन्या म्हैत्रा व अजुरे यांना देण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सोलापूर मध्य रेल्वे विभागात येणार्‍या 96 स्थानकांपैकी सर्व मोठी स्थानके, वर्कशॉप, पंपहाऊस, पथदिवे आदी ठिकाणी सौर पॅनल लावण्यात येणार असून त्यातून वीजनिर्मिती केली जाणार आहे. सध्या सोलापूर विभागातील विविध रेल्वेस्थानकांत दहा ते बारा स्थानकांवर तीन किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसविण्यात आले असून त्यातून वीजनिर्मिती चालू आहे तसेच सोलापूर विभागातील काही लहान स्थानके सौरऊर्जेवर आणण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे.

शिल्लक वीज महावितरणला देणार

सोलापूर मध्य रेल्वेत 2.13 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचा ठेका म्हैत्रा व अजुरे या दोन कंपन्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूर विभाग मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करणार आहे. रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांवर व वर्कशॉप ठिकाणावर सौरऊर्जा वापरून शिल्लक राहिलेली वीज महावितरणला देण्यात येणार आहे.