Mon, May 27, 2019 06:51होमपेज › Solapur ›  सोलापूरच्या रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ‘राम भरोसे’

 सोलापूरच्या रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ‘राम भरोसे’

Published On: Sep 04 2018 1:20AM | Last Updated: Sep 03 2018 11:08PMसोलापूर : इरफान शेख

सोलापूर डिव्हिजमधील रेल्वे प्रवाशांची सुरक्षा व त्यांचा प्रवास  ‘राम भरोसे’ झाला आहे. संपूर्ण डिव्हिजनमध्ये फक्त 220 जीआरपी पोलिस उपलब्ध असल्याने सोलापूर डिव्हिजनमधील अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर दरोडा टाकण्याचा व लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. डीआरएम हितेंद्र मल्होत्रा यांनी जीआरपी  वाढवण्यासाठी मुंबई येथील मुख्यालयात विनंती अर्ज केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर डिव्हिजीनमध्ये प्रवांशाच्या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

23 ऑगस्ट रोजी मुंबईहून चेन्नई स्थानकाकडे निघालेली चेन्नई एक्स्प्रेस लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न करमाळा तालुक्यातील पोफळज गावाजवळ घडला होता. चोरट्यांनी सिग्नलला चिखल लावून त्याला अदृश्य केले होते. त्यामुळे चेन्नई एक्स्प्रेसच्या चालकाने गाडीचा वेग कमी केला होता. याचा फायदा घेत दरोडेखोरांनी चेन्नई एक्स्प्रेसमध्ये चढून लुटमार करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आरपीएफ व जीआरपीच्या प्रसंगावधानाने चोरट्यांचा हा डाव अयशस्वी झाला होता. उलट रेल्वे पोलिसांनी सुभाष सुरेश पवार (वय 30 रा. केडगाव, जेऊर, करमाळा) याला अटक केली आहे. सध्या हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून तपासणी सुरू आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबईहून हैदराबादकडे निघालेल्या हुसेनसागर एक्स्प्रेसमधून अज्ञात चोरट्याने महिला प्रवाशाची रोख रक्कम व दागिन्यांची बॅग असा एकूण साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होेता. तो चोर आजतागायत सापडला नाही व रक्कमही मिळाली नाही. त्याचा तपास सुरु आहे.

सोलापूर डिव्हिजनमध्ये एकूण 10 जिल्हे येतात. त्यामध्ये 96 स्थानके आहेत. दक्षिण भारतामध्ये जाण्यासाठी सोलापूर डिव्हिजन मुख्य भूमिका बजावते. लाखोंच्या संख्येने रेल्वे प्रवासी सोलापूर डिव्हिजनमधून प्रवास करतात. त्यासाठी फक्‍त 220 जीआरपी पोलिस उपलब्ध आहेत.

जवळपास 40 ते 45 रेल्वेगाड्यांना धावताना जीरआरपी पोलिस बंदोबस्तासाठी असतात. 20 ते 25 मेल-एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्यांना कोणताही पोलिस बंदोबस्त नसतो. प्रवाशांना आपली सुरक्षा स्वत: करावी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

रेल्वे प्रवासात सुरक्षित प्रवास याची हमी आता राहिली नाही. अनेकवेळा प्रवासादरम्यान लुटमार, फसवेगिरी अशाप्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागते.

जीआरपी पोलिसांची डिव्हिजननुसार आकडेवारी
सोलापूर डिव्हिजन -220 जीआरपी, सिंकदराबाद डिव्हिजन (तेलंगणा)- 455 जीआरपी, दानापूर (बिहार) डिव्हिजन-1200 जीआरपी, झांसी (उत्तर प्रदेश) डिव्हिजन-445 जीआरपी, भोपाल (मध्य प्रदेश) डिव्हिजन -510 जीआरपी. ही आकडेवारी जीआरपी पोलिसांची आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवासात स्वत:ची सुरक्षा स्वत: करावी.
दौंड ते कुर्डवाडीदरम्यान प्रवाशांनी सावध राहावे

सोलापूर डिव्हिजनमधील दौंड ते कुर्डुवाडीदरम्यान सावध राहावे. कारण या मार्गावरच अनेकवेळा हुतात्मा एक्स्प्रेस, चेन्नई एक्स्प्रेस आदी गाड्यांवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये पोलिस असतील तर खिडक्या व दारे बंद करण्याच्या सूचना दिल्या जातात. यापुढे पोलिस असो किंवा नसो प्रवाशांनी सावध राहावे.