Mon, May 20, 2019 08:01होमपेज › Solapur › सोलापूर रेल्वे डिव्हिजनसाठी 906 कोटी

सोलापूर रेल्वे डिव्हिजनसाठी 906 कोटी

Published On: Feb 07 2018 11:17PM | Last Updated: Feb 07 2018 10:39PMसोलापूर : प्रतिनिधी

 सोलापूर रेल्वे डिव्हिजनसाठी रेल्वे मंत्रालयाकडून 906 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये 802 कोटी रुपये मागील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी मंजूर केले गेले आहेत, तर 104 कोटी नवीन कामांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे वाढत्या गर्दीचा विचार केला असता सोलापूर रेल्वे डिव्हिजनमध्ये नवीन रेल्वेगाड्यांची आवश्यकता होती. मात्र प्रवाशांच्या हाती निराशा हाती पडली आहे. कोणत्याही नवीन रेल्वेगाडीची उपलब्धता करण्यात आली नाही.

बुधवारी सोलापूर मध्य रेल्वे विभागाचे मंडल रेल प्रबंधक हितेंद्र मल्होत्रा  यांनी माध्यमांशी संवाद साधत यंदाच्या बजेटमधून प्राप्त झालेल्या योजनांचा आराखडा सांगितला. दौंड-मनमाड या मार्गावर रुळ दुहेरीकरणासाठी 210 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती सांगितली.

अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या मार्गावर 250 कि.मी. नवीन लाईन लावली जाणार आहे. पंढरपूर-फलटणसाठी 105 कि.मी. नवीन  रेल्वेलाईन जोडली जाणार आहे.त्याचप्रमाणे जेऊर ते आष्टी 78 कि.मी. प्रवास नवीन रेल्वेलाईनमुळे जोडला जाणार आहे. वाडी ते गुलबर्गापर्यंतचे मार्ग पूर्णता विद्युतीकरण झाले आहे.

रेल्वे रस्ता सुरक्षा कार्य
रेल्वे विभागामार्फत रोड सेफ्टी वर्कसाठी 13 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सोलापूर मध्य रेल्वे विभागातील 269 लेव्हल क्रॉसिंग (रेल्वे फाटक) गेटपैकी 144 फाटक पूर्णता बंद करण्यात आले आहेत.
उरलेल्या रेल्वे फाटकांमधून 27 लेव्हल क्रॉसिंग गेट यंदाच्या वर्षी बंद केले जाणार आहेत. पुढील तीन वर्षांत सोलापूर मध्य रेल्वे विभागातील सर्व रेल्वे फाटक बंद केले जातील.

रुळांचे नविनीकरण
सोलापूर विभागातील रुळांच्या रखडलेल्या कामांसाठी 90 कोटी रुपये मंजूर झाले आहेत, तर नवीन कामांसाठी 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
सोलापूर डिव्हिजनमधील 19 जुन्या पुलांचे सर्व्हे झाले आहेत. त्यामध्ये हे जुने व छोटे पूल ब्रिटिशकालिन आहेत. असे 100 जुने पूल बदललण्यात येतील. त्यासाठी 27 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्ही
सुरक्षेसाठी सोलापूर मध्य रेल्वे विभागातील प्रत्येक स्थानकांवर 15 सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.त्यामध्ये सोलापूर, अहमदनगर, दौंड, कोपरगाव, गुलबर्गा, कुर्डुवाडी, लातूर, शिर्डी, पंढरपूर, वाडी या स्थानकांवर उच्च प्रतीचे सीसीटूव्ही बसविण्यात येणार आहेत.

रुळांचे दुहेरीकरण
रुळांचे दुहेरीकरण करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.सोलापूर-दौंड दुहेरीकरणाचे काम सुरु आहे. यंदाच्या वर्षी वाकाव-माढा-वडशिंगे 15 कि.मी. दुहेरीकरणाचे काम पूर्ण होणार. अक्कलकोट ते बोरोटी असे 14 कि.मी. काम पूर्णत्वास आले आहे.प ुढच्या वर्षी भाळवणी ते वडशिंगे (34 कि.मी.), बोरोटी ते कुलाली (23 कि.मी.), गुलबर्गा-गाणगापूर (26कि.मी.) असे दुहेरीकरण होणार आहे.

सरकते जिने
सोलापूर मध्ये रेल्वे विभागातील 19 स्थानकांवर सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. त्यामध्ये सोलापूर रेल्वेस्थानक-3 जिने, गुलबर्गा रेल्वेस्थानक- 2 जिने, कुर्डुवाडी स्थानक- 3 जिने, दौंड स्थानक-3 जिने,पंढरपूर, लातूर, शिर्डी, कोपरगाव यासाठी प्रत्येकी दोन सरकते जिने मंजूर झाले आहेत. येत्या दोन वर्षांत या स्थानकांवर सरकते जिने  बसविण्यात येतील.
यावेळी सोलापूर रेल्वे विभागातील अधिकारी उपस्थित होते.