Mon, Jun 24, 2019 21:01होमपेज › Solapur › कोट्यवधींचा नागरी सुविधांचा निधी पडून

कोट्यवधींचा नागरी सुविधांचा निधी पडून

Published On: Mar 06 2018 8:02PM | Last Updated: Mar 06 2018 7:25PM सोलापूर  : महेश पांढरे

जिल्ह्यातील नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिका आणि पंचायतीमधून सर्वसामान्य नागरिकांना नागरीसुविधा पुरविण्यासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी यंत्रणा सक्षम नसल्याने हा कोट्यवधी रुपयांचा निधी तसाच पडून आहे. दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळविण्यासाठी त्रेधातिरपीट करावी लागत आहे. सोलापूर जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या मोहोळ नगरपालिकेसाठी 50 लाख रुपये, तर माढा आणि माळशिरस नगरपंचायतीसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. पूर्वी गावांचा दर्जा असणार्‍या या नगरांना आता शहराचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे शहरातील सेवासुविधांप्रमाणे अनेक सेवा नागरिकांना तत्काळ मिळाव्यात, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची असते.

त्यामुळे त्या सुविधा जलद मिळाव्यात त्यासाठी यंत्रणा उभी करावी म्हणून राज्य शासनाच्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून नव्याने स्थापन झालेल्या या नगरपंचायती आणि नगरपालिकांना मुबलक निधी देण्यात आला आहे. मात्र कर्मचारी आणि अधिकार्‍यांअभावी यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे नागरिकांना या सेवा वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे ‘आव शहराचा आणि कारभार गावाचा’ अशी परिस्थिती या नगरपंचायतींची झाली आहे.

दुसरीकडे नगराध्यक्षांचा रुबाब वाढला असून त्यांच्या दिमतीला गाड्या आणि आलिशान कार्यालये थाटली असली तरी त्याठिकाणी बसून जनतेच्या समाधानाचे काम करताना त्यांना अनेक आडचणी येत आहेत. त्यामुळे आधी यंत्रणा सक्षम करावी, अशी अपेक्षा  नगरपालिकांच्या नगराध्यक्षांनी व्यक्त केली आहे.