Thu, Aug 22, 2019 08:45होमपेज › Solapur › सोलापूर महापालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेत होणार वाढ

सोलापूर महापालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेत होणार वाढ

Published On: Jan 23 2018 9:39PM | Last Updated: Jan 23 2018 9:39PMसोलापूर ः  प्रतिनिधी

या ना त्या कारणावरून विविध संघटनांकडून महापालिकेत करण्यात येणार्‍या आंदोलनांना चाप बसविण्याबरोबरच मनपात येणार्‍यांना शिस्त लावण्यासाठी आता मनपाची सुरक्षाव्यवस्था मजबूत केली जाणार आहे. सुरक्षारक्षकांमध्ये वाढ करण्याबरोबरच ये-जा करण्यासाठी केवळ दोनच द्वार ठेवण्यात येणार आहेत.

मनपाच्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्‍न याआधी अनेकदा ऐरणीवर आला आहे. नागरी सुविधांप्रश्‍नी अनेक राजकीय, सामाजिक संघटना अधूनमधून आंदोलने करीत असतात. मात्र  अचानक व ‘वेगळ्या’ पद्धतीने होणार्‍या आंदोलनांमुळे मनपाच्या सुरक्षाव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची अनेक उदाहरणे आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी काही संघटना मनपातील कार्यालयांची तोडफोड केल्याच्या अनेक घटना सर्वश्रृत आहेत. गतवर्षी एका संघटनेने शहरातील मोकाट डुक्‍करांच्याप्रश्‍नी चक्‍क मनपा आयुक्‍तांच्या खुर्चीवर डुक्‍कराचे पिल्लू सोडून आगळेवेगळे आंदोलन केले होते. याची गांभीर्याने दखल घेऊन तत्कालीन आयुक्‍त विजयकुमार काळम यांनी मनपाची सुरक्षाव्यवस्थेत सक्षम करण्याचा निर्णय घेतला होता. मनपात येणार्‍या अभ्यांगतांची नोंद करण्याचेही ठरले होते; मात्र हा निर्णय कागदावरच राहिला.

नुकतेच एका कामगार संघटनेने कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नी हिंसक पद्धतीने आंदोलनाचा प्रयत्न केला. मात्र मनपा कर्मचारी व पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आले. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून मनपाच्या सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करण्यात आली होती. पोलिसांनी मनपातील एकूण प्रवेशद्वार, सीसीटीव्ही यंत्रणा, आपत्कालीन व्यवस्था आदींची पाहणी केली. यासंदर्भात पोलिसांनी नुकतेच मनपाला आवश्यक सुरक्षेचे उपाय योजण्याबाबत अहवाल दिला. याच्या आधारे आता मनपाची सुरक्षाव्यवस्था सुधारण्यात येणार आहे. 

खासगी रक्षक तैनात करणार

महापालिकेत लवकरच खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत. याकामी प्रशासनाकडून आवश्यक मान्यतेचे सोपस्कर पूर्ण करण्यात आले आहेत. मनपाच्या प्रवेशद्वारांबरोबरच आतील भागातही हे रक्षक राहणार आहेत. मनपाच्या प्रशासकीय इमारतीला लागून तसेच मागे असलेले एकूण तीन प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहेत. मनपासमोरील असलेले प्रवेशद्वार हे  मनपात  येण्यासाठी तसेच कौन्सिल हॉलनजिक असलेले प्रवेशद्वार हे जाण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. याशिवाय सुरक्षेच्यादृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत. 
एकंदर मनपाची सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात येणार असल्याने याचे स्वागत केले जात आहे.