Tue, Apr 23, 2019 20:10होमपेज › Solapur › सोलापूर मनपा सभागृह नेत्याच्या नियुक्तीविषयी उत्सुकता 

सोलापूर मनपा सभागृह नेत्याच्या नियुक्तीविषयी उत्सुकता 

Published On: Dec 26 2017 1:35AM | Last Updated: Dec 25 2017 10:37PM

बुकमार्क करा

सोलापूर : वेणुगोपाळ गाडी

महापालिकेचा प्रभारी  सभागृहनेता कोण होणार याविषयी राजकीय गोटात प्रचंड उत्सुकता आहे. या पदावरून पालकमंत्री व सहकारमंत्री अशा दोन गटांत धुसफूस असून प्रदेश भाजप यापदी कोणाची वर्णी लावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सभागृहनेते सुरेश पाटील हे आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  ते बरे होऊन परत येईपर्यंत महापालिका सभेचे कामकाज चालविण्यासाठी प्रभारी सभागृहनेत्याची नियुक्ती पक्षाकडून होणे गरजेचे आहे. पाटील हे पालकमंत्री गटाचे आहेत. त्यामुळे नवीन सभागृहनेतापद हे आपल्या गटाकडचे राहावे, अशी पालकमंत्री गटाची इच्छाच नव्हे दावादेखील आहे. प्रभारी सभागृहनेतेपद सहकारमंत्री गटाला मिळावे, असे या गटातील काहींना वाटते. यावरून या दोन गटांत धुसफूस निर्माण झाली आहे. गत आठवड्यात मनपा सर्वसाधारण सभेच्या नियोजनाबाबत महापौर, उपमहापौर, शहराध्यक्षांनी बोलाविलेल्या पार्टी मिटिंगला पालकमंत्री गटाच्या 35 नगरसेवकांनी दांडी मारली. याचीच पुनरावृत्ती दुसर्‍या दिवशी झालेल्या सभेत झाली. पालकमंत्री गटाच्या या खेळीमुळे महापौरांना कोरमअभावी सभा तहकूब करावी लागली.

वास्तविक सभागृहनेतापद हे आपल्या गटालाच मिळावे, अशी जर पालकमंत्री गटाची मागणी असेल तर या गटाने पार्टी मिटिंगला उपस्थित राहून तशी मागणी केली असती तर या पदाचा तिढा सुटला असता, असे सहकारमंत्री गटाचे म्हणणे आहे. पालकमंत्री गटाच्या खेळीमुळे सभा चालविण्याबाबत अडचण येऊन पक्षाची बदनामी होत असल्याची सहकारमंत्री गटाची तक्रार आहे. 
पार्टी मिटिंग व सभेला पालकमंत्री गटाच्या नगरसेवकांनी मारलेल्या दांडीबाबत  शहराध्यक्षांनी प्रदेश भाजपकडे अहवाल पाठवून कारवाईची शिफारस करतानाच प्रभारी  सभागृहनेत्याची नियुक्तीही करण्याची मागणी केली आहे. महापौरांनीदेखील मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्षांना पत्र पाठवून प्रभारी सभागृहनेत्याची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. 

सभागृहनेता हे पद महत्त्वपूर्ण व जबाबदारीचे असल्याने या पदाला न्याय देणार्‍या व्यक्तीची नियुक्ती होणे अपेक्षित आहे. या पदाची धुरा आता कोण वाहणार याविषयी उत्कंठा आहे.