Tue, Jun 18, 2019 19:18होमपेज › Solapur › स्थानिक स्वराज संस्थेसारखी बाजार समिती निवडणूक

स्थानिक स्वराज संस्थेसारखी बाजार समिती निवडणूक

Published On: Jan 06 2018 1:28AM | Last Updated: Jan 05 2018 9:04PM

बुकमार्क करा
सोलापूर : महेश पांढरे 

यापुढे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये ज्यांच्या नावावर सातबारा उतारा त्यांना मतदानाचा अधिकार शासनाने दिला आहे. त्यामुळे यापुढे बाजार समितीच्या निवडणुका या स्थानिक स्वराज संस्थासारख्या होणार असून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील 126 गावांमध्ये 15 गण पाडले जाणार आहेत. तसेच यामध्ये विविध जाती प्रवर्गासाठी गण राखीव करण्यात येणार आहेत.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील 36, तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील 90 गावांचा समावेश आहे. या गावातील शेतकर्‍यांची यादी जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आली आहे. राज्य सहकार विभागाने आता शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. त्यामुळे गावनिहाय मतदारयाद्या तयार होणार आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गावांची यादी जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केली आहे. यामध्ये आता संचालक मंडळासाठी निवडून द्यावयाच्या 15 जागेसाठी या 126 गावांमध्ये 15 गण पाडण्यात येणार असून त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती आणि इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण चिठ्ठीव्दारे काढण्यात येणार आहे.

तसेच मतदार याद्या गणनिहाय तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे या निवडणुका आता लोकशाहीमार्गाने होणार आहेत. तर उर्वरित हमाल व तोलार आणि व्यापारी मतदारसंघातून निवडून द्यायच्या दोन जागेसाठी स्वतंत्र यादी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे सत्ता मिळविणार्‍या लोकांच्या हातातून काही अंशी बाजार समितीची सत्ता जाणार असून यावर लोकशाहीमार्गाने निवडून येणार्‍या सदस्यांनाच आता बाजार समितीवर सत्ता स्थापन करता येणार आहे. तसेच सर्वसामान्य शेतकर्‍यांना ज्यांना 10 गुंठ्यापेक्षा अधिक जमीन आहे. अशा शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे आता बाजार समितीची सत्ता कोणाला द्यायची, हे सर्वसामान्य शेतकरीच ठरवणार आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या कामकाजामध्ये काही अंशी पारदर्शकता येणार आहे.

17 संचालकांसाठी स्वतंत्र निवडणूक

सर्वसाधारण जागेवर निवडून द्यायच्या 15 संचालकांसाठी दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील 126 गावचे 15 गण पाडण्यात येणार असून यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती, इतर मागास प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. तर हमाल तोलार आणि व्यापारी मतदारसंघातून दोन जागा निवडण्यात येणार आहेत. तर उर्वरित गणातून सर्वसाधारण जागेसाठी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक संचालक हा स्वतंत्रपणे निवडून येणार आहे.