Tue, May 21, 2019 12:40होमपेज › Solapur › एलबीटी अनुदान; सोलापूरसह तीन नावे नाहीत

एलबीटी अनुदान; सोलापूरसह तीन नावे नाहीत

Published On: Mar 06 2018 8:02PM | Last Updated: Mar 06 2018 7:20PMसोलापूर : प्रतिनिधी 

राज्य शासनाकडून एलबीटी अनुदानाबाबत काढलेल्या शासन निर्णयामध्ये (जी.आर.) सोलापूर, पुणे, मीरा भाईंदर अशा तीन महापालिकांची नावे नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. जर हे अनुदान वेळेवर न मिळाल्यास मनपा सेवकांचे पगार वेळेवर करण्याबाबत अडचणी निर्माण होणार आहेत. एलबीटी बंद केल्यापासून शासनाकडून संबंधित महापालिकांना एलबीटीचे अनुदान दिले जाते. यासंदर्भात शासनाकडून दरमहा जी.आर. काढला जातो.

यामध्ये संबंधित सर्व महापालिकांची नावे व त्यांना देण्यात येणार्‍या अनुदानाची आकडेवारी नमूद असते. हे जी.आर. जारी झाल्यावर ही रक्कम मनपाच्या खात्यावर जमा होते. या महिन्यात शासनाकडून जी.आर. निघाला खरा, पण त्यात सोलापूर, पुणे व मीरा भाईंदर अशा तीन मनपांची नावे नाहीत. असे पहिल्यांदाच घडले आहे. सोलापूर महापालिकेेला शासनाकडून 18 कोटी 60 लाख इतके अनुदान मिळते.

आर्थिक अरिष्टात असलेल्या मनपाला सेवकवर्गाच्या पगारासाठी या अनुदानावर अवलंबून राहावे लागते. मनपा सेवकांचे पगार दरमहा 8 ते 10  तारखेदरम्यान होतात. जर एलबीटी अनुदान वेळेवर मिळाले नाही तर या महिन्यात सेवकांचा पगार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एकीकडे थकीत महसुलाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सध्या ‘मोहिमे’वर असलेल्या मनपा कर्मचार्‍यांचे वेतन एलबीटी अनुदान वेळेत न मिळाल्यास उशीर लागू शकते.

 शासनालाही कदाचित आर्थिक अडचण असावी : लोंढे

यासंदर्भात मनपाचे मुख्य लेखापाल दत्तात्रय लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कदाचित शासनालाही आर्थिक अडचण असल्याने सर्व मनपांना एकाचवेळी अनुदान देण्यात अडचण असावी. आर्थिक उपलब्धतेनुसार अनुदान मागेपुढे दिले जाऊ शकते. थोडा उशीर होईल पण महापालिकेला अनुदान मिळण्यात काही अडचण नाही, असे मला वाटते.