Mon, Jul 06, 2020 11:44होमपेज › Solapur › सोलापुरातील हातमाग, वस्त्रोद्योगाची निर्यात निम्म्यावर

सोलापुरातील हातमाग, वस्त्रोद्योगाची निर्यात निम्म्यावर

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 08 2018 11:03PMसोलापूर : प्रतिनिधी

सध्याच्या घसरलेल्या अर्थव्यवस्थेचा फटका सोलापुरातील हातमाग व वस्त्रोद्योगाला बसला असून निर्यातीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शिवाय कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली असून रुपयाच्या अवमूल्यनाचा फटकाही या उद्योगाला बसत आहे. त्यामुळे या उद्योगावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांचा रोजगार धोक्यात आला आहे. 

वस्त्रोद्योग क्षेत्राची निर्यात 600 कोटींच्या घरात होती. ती आता 250 कोटींवर आल्याने या उद्योगासमोर आर्थिक संकट उभे ठाकले असल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली आहे. 

सोलापुरी चादर व टॉवेलसाठी येथील हातमाग व वस्त्रोद्योग उद्योगाची देशभरासह जगभरात ओळख आहे. परंतु, रुपयाचे होणारे अवमूल्यन आणि बिघडलेल्या आर्थिक व्यवस्थेचा फटका सध्या या मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणार्‍या क्षेत्राला बसला आहे. वस्त्रोद्योगासाठी लागणारे यार्न आणि फौंड्रीसाठी लागणारी सँड आणि अन्य काही वस्तूंची विदेशातून आयात करावी लागते. त्यापोटीचा व्यवहार हा डॉलरमध्ये करावा लागतो. डॉलरचे दर वाढल्याने जास्त पैसे मोजावे लागत असून, त्यात या कच्च्या मालाचे दरही वाढले आहेत. यंत्रमागधारक धाग्यामध्ये पॉलिस्टर यार्न आणि कलर यार्नचा वापर करत असतात. या यार्नच्या आयातीपोटी यंत्रमागधारकांना मोठ्या प्रमाणात रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे या वस्तू किलोमागे 10 ते 15 रुपयांनी महाग झाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे सोलापुरातील हातमाग व यंत्रमागनिर्मित वस्तूंची निर्यात ही वर्षाकाठी 600 कोटींच्या घरात होती. ती अलीकडे निम्म्यावर आली आहे.

सोलापुरात इलेक्ट्रिक पंप व मोटारीदेखील बनविल्या जातात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात या पंप व मोटारींना मोठी मागणी आहेे. पेट्रोल व डिझेलचे दर प्रचंड वाढल्याने या पंप व मोटारीच्या कच्च्या मालाच्या आवक दरातही मोठी वाढ झाली आहे. रुपयाचे अवमूल्यन, इंधनाचे भडकलेले दर यामध्ये स्थानिक उद्योग भरडला जात असून निर्यातीत मोठी घट झाली आहे. देशांतर्गतदेखील मालाची मागणी घटली आहे, अशीपरिस्थिती निर्माण झालेली आहे. इलेक्ट्रिक मोटारी तयार करताना कॉपर वायरची गरज भासते. ही वायरही आता प्रतिटनामागे पाच लाख रुपयांनी महागली आहे. त्यामुळे पंप व मोटारी यांच्या दरातही नाईलाजाने वाढ करावी लागणार असून त्यामुळे विक्री कमी होण्याची भीतीदेखील स्थानिक उद्योजकांनी व्यक्त केली आहे.