Fri, Apr 26, 2019 19:44होमपेज › Solapur › बरखास्तीसंदर्भात 24 सप्टेंबरला सुनावणी 

बरखास्तीसंदर्भात 24 सप्टेंबरला सुनावणी 

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 29 2018 12:10AMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बरखास्तीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची पुढील सुनावणी आता 24 सप्टेंबर रोजी होणार असल्याने महिनाभर तरी संचालकांना मुदतवाढ मिळाली आहे.
 सोलापूर जिल्हा बँकेवर सहकार विभागाने अचानक प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांची नियुक्‍ती केली होती. त्यामुळे ही बरखास्तीची कारवाई चुकीची असून राजकीय द्वेषातून असल्याने या बरखास्तीला संचालक शिवानंद पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज सुनावणी घेण्यात आली. मात्र यासंदर्भात  दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर यावर पुढील सुनावणी 24 सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ बरखास्तीसाठी नाबार्डने केवळ जिल्हा बँकेसाठी कालबध्द कार्यक्रम आखून द्यावा एवढीच विनंती केली असल्याची माहिती न्यायालयासमोर मांडली.  याचिकाकर्त्यासही यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करायचे असेल तर त्यांनीही दाखल करावे, अशा सूचना कोर्टाने दिल्या आहेत. पक्षकारांनी काही कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर त्यांनी 10 सप्टेंबरपूर्वी करावी, अशा सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बरखास्तीसंदर्भातील पुढील सुनावणी आता 24 सप्टेंबर रोजी होणार असल्याने यावेळी न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.