Thu, Jun 20, 2019 21:35होमपेज › Solapur › सोलापूर : पेटवून घेतलेल्या विवाहितेचा मृत्यू

सोलापूर : पेटवून घेतलेल्या विवाहितेचा मृत्यू

Published On: Aug 25 2018 7:46PM | Last Updated: Aug 25 2018 7:46PMमोहोळ: प्रतिनिधी

सासरच्या त्रासाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेणाऱ्या विवाहितेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अनुराधा खंडू भिसे (वय ३२, रा. नालबंदवाडी, ता. मोहोळ) असे मृत विवाहितेचे नाव आहे. १६ ऑगस्ट रोजी राहत्या घरी तिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. याप्रकरणी मोहोळ पोलिसात पतीसह सासू सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अनुराधा खंडू भिसे आणि खंडू हरिदास भिसे यांचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या दोन महिन्यानंतर अनुराधा यांच्या सासरच्या लोकांनी घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आण म्हणून मारहाण करुन हाकलून दिले होते. त्यावेळी त्यांच्या माहेरच्या लोकांनी त्यांचे पती, सासू, सासरा यांची समजूत काढून पुन्हा नांदायला पाठवले होते. मात्र त्यांच्या वर्तणात कोणताच बदल झाला नाही.

अनुराधा भिसे १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता घरात बसल्या होत्या. त्यावेळी त्यांची सासू मंदोधरी हरिदास भिसे, सासरा हरिदास मारुती भिसे यांनी शिवीगाळ करुन " तू घरातून बाहेर ये, रॉकेल ओतून पेटवून घे" असे म्हणून अनुराधा यांच्या हातात रॉकेलचा डबा दिला. सतत होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात त्या गंभीर भाजल्याने प्रथम त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल सोलापूर येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मुळे हॉस्पीटल येथे सुरु होते. मात्र २३ ऑगस्ट रोजी उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.\

या प्रकरणी मृत अनुराधा यांचा भाऊ परशुराम बाळू रायबान (रा.माढा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोहोळ पोलिसात पती खंडू हरिदास भिसे, सासू मंदाधरी हरिदास भिसे, सासरा हरिदास मारुती भिसे (सर्व रा. नालबंद वाडी ता. मोहोळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि विक्रांत बोधे हे करीत आहेत. दरम्यान मोहोळ पोलीसांनी आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.