Fri, Apr 19, 2019 12:21होमपेज › Solapur › सुरेश पाटील यांचे नगरसेवकपद शाबूत

सुरेश पाटील यांचे नगरसेवकपद शाबूत

Published On: May 26 2018 12:20AM | Last Updated: May 25 2018 11:44PMसोलापूर : प्रतिनिधी

रुग्णालयात उपचार घेत मृत्यूशी संघर्ष करतानाच राजकीय भवितव्य अडचणीत येऊ नये, याकरिता धडपडत असलेले भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील हे शुक्रवारी पुण्याहून रुग्णवाहिकेतून थेट मनपा सभेत दाखल झाले. यामुळे त्यांचे नगरसेवकपद शाबूत राहिले आहे. गेल्या  सहा महिन्यांपासून पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. एखादा नगरसेवक सलग तीन मनपा सभांना विनासंमती गैरहजर राहिल्यास त्याचे नगरसेवकपद रद्द होते. जर सभांना संमती घेऊन अनुपस्थित राहावयाचे असेल, तसा रजेचा प्रस्ताव मनपा सभेत द्यावा लागतो. जर सभेने मंजुरी दिली, तर सहा महिन्यांपर्यंत सभांना अनुपस्थित राहण्याची मुभा त्या नगरसेवकाला मिळते.

सुरेश पाटील यांनीदेखील उपचारासाठी सहा महिन्यांसाठी सभेला गैरहजर राहण्याची परवानगी डिसेंबरमध्ये मनपा सभेकडे मागितली होती. त्यानुसार त्यांना संमतीही देण्यात आली होती. सहा महिन्यांची मुदत 30 मे रोजी संपणार असल्याने पाटील यांना या मुदतीच्या आत मनपा सभेला उपस्थित राहणे गरजेचे होते; अन्यथा त्यांचे नगरसेवकपद रद्द होण्याचा धोका होता. यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्‍न निर्माण होऊ शकला असता. हे लक्षात घेऊन सत्ताधार्‍यांनी शुक्रवारी मनपाची सभा बोलाविली होती. याकरिता पाटील हे पुण्याच्या एका रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मनपा सभेत हजर झाले. यावेळी डॉक्टरांचा चमू त्यांच्यासमवेत होता. 

व्हीलचेअरवरुन त्यांना सभागृहात आणण्यात आले. याकरिता खास रॅम्पची सोय करण्यात आली होती. दरम्यान, पाटील यांना पाहण्यासाठी महापालिकेच्या आवारात समर्थक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी आवरण्यासाठी पोलिस बंदोबस्त होता. सभागृहात येऊन त्यांनी  सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सही केली. अवघ्या पाच मिनिटानंतर त्यांना लगेचच सभागृहातून बाहेर हलविण्यात आले. सभागृहात येण्यापूर्वी पाटील यांचे नगरसेविकांनी औक्षण केले. यावेळी सभागृहातदेखील वातावरण भावुक झाल्याचे पहावयास मिळाले. पाटील हे सभेला आल्याने त्यांचे नगरसेवकपद शाबूत राहिले. आता आणखीन सहा महिने त्यांना सभेला अनुपस्थित राहण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. केवळ यासंदर्भातील औपचारिकता त्यांना पूर्ण करावी लागणार आहे.