Mon, Jun 17, 2019 02:10होमपेज › Solapur › देशात सर्वात महाग पेट्रोल सोलापुरात

देशात सर्वात महाग पेट्रोल सोलापुरात

Published On: May 23 2018 11:35PM | Last Updated: May 23 2018 11:34PMसोलापूर : इरफान शेख

 देशातील सर्वात महाग सोलापुरात व राज्यांचा विचार केला असता सर्वात महाग महाराष्ट्र राज्यात पेेट्रोल व डिझेलचे दर झाले आहेत.पेट्रोलच्या दराचा भडका उडाल्याने मध्यमवर्गीयांत व वाहनधारकांत सरकारविरोधात संतापाची लाट पाहावयास मिळत आहेे. सोलापूर शहरात पेट्रोल 86 रु. प्रती लि. व डिझेल 73.34  रु. प्रती लि. झाले आहे. सोलापुरातील एका पेट्रोल पंपचालकाने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यातील निवडणूक झाल्याबरोबर पेट्रोलचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. पेट्रोलिअम कंपन्यांना दर वाढविण्याची परवानगी दिल्याने सरकारला व जनतेला न जुमानता कंपन्या फायद्यानुसार दर वाढवू लागले आहेत, अशी टिकाही होत आहे.

गेल्या नऊ दिवसांत पेट्रोल 2.24  व डिझेल 2.15 रुपयांनी वाढले आहे. गेल्या 26 महिन्यांत पेट्रोलचे दर 36 टक्के व  डिझेलचे  दर 54 टक्क्यांनी वाढले आहे. तेल कंपन्यांचा नफाही वाढला आहेे. पेट्रोलच्या दरामध्ये सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशांना आग लागली आहे. सोशल मीडियावर केंद्र सरकारविरोधात पेट्रोल दरवाढी विषयामुळे मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पेट्रोलियम कंपन्यांचा प्रत्यक्ष दर पेट्रोलसाठी 37.19 रुपये आहे. त्यावर 25.44 टक्के एक्साईज ड्युटी, 21.26 टक्के व्हॅट व 4.72 टक्के डिलर्स कमिशन आकारले जाते. जवळपास 52 टक्के कर लादल्यानंतर सर्वसामान्य जनतेला पेट्रोल विक्रीसाठी उपलब्ध केले जाते. केंद्र सरकारने तर उत्पादन शुल्क घटविण्यास नकार देत हात झटकले आहेत.

महाराष्ट्र राज्यात सत्तापरिवर्तन झाल्याबरोबर फडणवीस सरकार विराजमान झाल्यापासून पेट्रोलवर दुष्काळी कर म्हणून 5 टक्के कर आकारण्यात येत आहे. यामुळेदेखील पेट्रोल व डिझेलच्या दरात इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात अधिक फरक जाणवतो. त्यामुळे येथे पेट्रोल व डिझेल महाग  असते. सध्या दुष्काळ नसतानासुध्दा दुष्काळी कर आकारला जाणे म्हणजे एकप्रकारे जनतेवर अन्याय असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवर आकारले जाणारे सेस कमी करावेत किंवा हटवावे, अशीही मागणी अनेकवेळा करण्यात आली आहे. पेट्रोलवर अधिभार लावल्यामुळे  पेट्रोलच्या किंमती उच्चांकी गाठत आहेत.