होमपेज › Solapur › विडी कामगारांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव ‘लाल’ फितीत अडकला

विडी कामगारांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव ‘लाल’ फितीत अडकला

Published On: May 08 2018 10:40PM | Last Updated: May 08 2018 9:03PM सोलापूर : वेणुगोपाळ गाडी

शहरातील सुमारे 70 हजार विडी कामगारांसाठी 50 खाटांचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव लाल फितीच्या कारभारामुळे केंद्र शासनाकडे धूळखात पडून आहे. याकामी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पाठपुरावा सुरु असून सत्ताधारी पक्षाकडूनही जोरदार प्रयत्न होणे अपेक्षित आहे. केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या वेल्फेअर विभागाकडून विडी कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात.  यामध्ये घरकुलाला अनुदान, आरोग्यविषयक उपचार, त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती आदींचा समावेश आहे. आरोग्यविषयक योजनेंतर्गत सोलापुरातील विडी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना बाह्यरुग्ण विभागाची सोय आहे तसेच विविध आजारांवर उपचार घेतल्यावर वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्ती केली जाते. मात्र ही प्रक्रिया जिकिरीची व वेळखाऊ असल्याने विडी कामगारांची ससेहोलपट होते. हे लक्षात घेता विडी कामगारांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची मागणी कामगार संघटनांनी केली होती.  

सुमारे दहा वर्षांपूर्वी सोलापुरात एका कार्यक्रमासाठी आलेल्या तत्कालीन केंद्रीय कामगारमंत्र्यांनी विडी कामगारांच्या स्वतंत्र हॉस्पिटलचा प्रस्ताव आल्यास शासन निधी देईल, असे घोषित केले होते. त्यानुसार तत्कालीन खा. सुभाष देशमुख यांनी तसा प्रस्ताव देऊन कुंभारीमध्ये रुग्णालयाच्या उभारणीचे कामही सुरू केेले. मात्र राजकीय श्रेयवादाचे राजकारण आडवे आल्याने ही योजना साकारु शकली नव्हती.

तीन वर्षांपूर्वी केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी सोलापुरात माकपच्यावतीने आयोजित कार्यक्रमात विडी कामगारांसाठी 50 खाटांचे हॉस्पिटल सुरु करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार माकपप्रणित संस्थेतर्फे रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकार्‍यांमार्फत नागपूरच्या वेल्फेअर कमिनशनरला सादर करण्यात आला. नंतर वेल्फेअर कमिशनकडून केंद्रीय वेल्फेअर कमिशनरकडे हा प्रस्ताव पाठविण्याचे सोपस्कर पूर्ण झाले. दरम्यानच्या काळात बंडारु दत्तात्रय यांचे मंत्रीपद गेल्याने या योजनेला गती मिळू शकली नाही. बंडारु यांच्या जागी हरजितसिंग आले. त्यांची तीन महिन्यांपूर्वी गोदूताई घरकुलाचे प्रतर्वक, माजी आ. नरसय्या आडम यांनी भेट घेतली. त्यावर मंत्रिमहोदयांनी या प्रकरणाची फाईल सादर करण्याची सूचना संबंधित अधिकार्‍यांना केली. 

गोदूताईनगरात असलेली 5 एकर जागा या रुग्णालयासाठी भाडेतत्त्वावर किंवा खरेदीने देण्याची माकपची तयारी आहे. केंद्र तसेच राज्य सरकार मिळून ही योजना राबविण्याचे नियोजन आहे. स्थानिक  सत्ताधारी पक्षाचे खा. शरद बनसोडे यांनी माकपच्या पाठपुराव्याला साथ दिली तर ‘लाल’ फितीत अडकलेली ही योजना मंजूर होऊन साकारण्यातील अडचण दूर होणार आहे.