Tue, May 21, 2019 04:08होमपेज › Solapur › सत्तेसाठी राजकीय घराण्यांमध्ये चुरस!

सत्तेसाठी राजकीय घराण्यांमध्ये चुरस!

Published On: Jun 03 2018 11:03PM | Last Updated: Jun 03 2018 9:58PMसोलापूर : संतोष आचलारे 

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एक मंत्री, चार माजी आमदार यांच्यासह आजी व माजी आमदार कुटुंबातील सदस्य रिंगणात उतरले आहेत. बाजार समितीच्या सत्तेसाठी राजकीय घराण्यांत चुरस असून पक्षीय भेद बाजूला सारुन या कुटुंबाकडून आटोकाट प्रयत्न होत आहेत. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे स्वत: कुंभारी मतदार संघात आहेत. माजी आमदार तथा बाजार समितीचे माजी सभापती दिलीप माने हिरज, शिवशरण पाटील  यांनी भंडारकवठे, सिद्रामप्पा पाटील यांनी मुस्ती मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. माजी आमदार पुत्र महादेव चाकोते, पृथ्वीराज माने, अशोक देवकते, हरिष पाटील, अमर पाटील, राजशेखर शिवशरण पाटील आदींनीही बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख व बाजार समितीचे माजी सभापती राजशेखर शिवदारे या दोघांच्या कुटुंबातील सदस्य निवडणुकीत नाहीत. मात्र सहकार मंत्री देशमुख यांच्या अत्यंत जवळचे व लोकमंगल समूहातील प्रमुख विश्‍वस्त भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे बंधू इंद्रजित पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. महापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांनीही या निवडणुकीत थेट न उतरता आपले चिरंजीव जितेंद्र साठे यांना पुढे केले आहे. याशिवाय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके  हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बाजार समितीच्या माजी सभापती इंदुमती अलगोंडा-पाटील व मंद्रुप येथील राष्ट्रवादीचे नेते गोपाळराव कोरे आदींनीही या निवडणुकीसाठी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार दिलीपराव माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने, बंधू जयकुमार माने, भाच्चा धनंजय भोसले यांचेही अर्ज दाखल करण्यात आले असले तरी यांच्यापैकी कोणाचा तरी एकच अर्ज राहण्याची शक्यता आहे. बाजार समितीचे माजी सभापती सुरेश हसापुरे यांच्यासह त्यांचे बंधू रमेश हसापुरे यांनीही मनसेच्या माध्यमातून बाजार समितीच्या यार्डात इंजिन आणण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप विरोधात सेना,काँग्रेस,राष्ट्रवादी एकत्र!

 सोलापूर : महेश पांढरे

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेते मंडळीकडून सुरु झाला आहे.त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाची भूमिका असणारे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम काका साठे हे आपली भूमिका आज कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट करणार आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी अधिक रस घेतला आहे.

त्यामुळे भाजपा विरोधात आता सर्वपक्षीय नेत्यांनी मोट बांधण्याचा निर्धार केला असून त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपाला या निवडणुकी रोखण्यासाठी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळीनी प्रयत्न सुरु केले असून त्यांनी राष्ट्रवादीने वेगळा निर्णय घेवू नये, यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाच साकडे घातल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीची या निवडणुकीत काय भूमिका असणार आहे, हे आज स्पष्ट होणार असून राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बळीराम काका साठे यांनी वडाळा येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. कार्यकर्त्यांची भावना आणि नेत्यांचा आदेश यामध्ये आता काका साठे काय निर्णय घेणार याकडे  लक्ष लागले आहे. तर या निवडणुकीत भाजपाची ताकद कमी करण्यासाठी शिवसेनेला पॅनलमध्ये घेण्याची तयारी काँग्रेसने ठेवली आहे.  छाननीनंतरच्या वाटाघाटीत शिवसेनेला दोन किंवा तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने भाजपा सोबत येण्यासाठी भाजपाचे काही नेते मंडळी प्रयत्नशील असून बोलणीही सुरु आहेत.

राष्ट्रवादीकडून अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे दिसून येत आहे. तर यावर राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष बळीराम साठे यांना विचारणा केली असता पक्षाचा आदेश आणि कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेवून निर्णय घेवू असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे बळीराम काका साठे हे आज वडाळा येथे कार्यकर्त्यांसमोर काय निर्णय जाहीर करणार यावरच त्यांची बाजार समिती निवडणुकी विषयीची भूमिका स्पष्ट होणार आहे.