Sat, Aug 24, 2019 21:11होमपेज › Solapur › सोलापुरात काँग्रेस व पालकमंत्र्यांमुळे सहकारमंत्र्यांची दमछाक

सोलापुरात काँग्रेस व पालकमंत्र्यांमुळे सहकारमंत्र्यांची दमछाक

Published On: Jun 27 2018 1:22AM | Last Updated: Jun 26 2018 8:25PMसोलापूर : महेश पांढरे 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराला सध्या चांगलाच जोर चढला असून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीसह पालकमंत्री  आदी सर्वपक्षीय नेते मंडळी एकवटली आहेत. त्यामुळे गावोगाव बैठका आणि प्रचार फेर्‍यांना ऊत आला असून सहकारमंत्र्यांची पुरती दमछाक झाल्याचे चित्र आहे.

सध्या बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासोबत असलेल्या भाजपच्या गटाने एकत्रित येऊन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेल विरोधात पॅनल उभा केलेला आहे. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक म्हणजे सहकार मंत्री  सुभाष देशमुख यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते मंडळी अशीच झाली आहे. सहकारमंत्री देशमुख यांच्या विरोधात माजी आ. दिलीप माने, राष्ट्रवादीचे नेते बळीराम काका साठे, शिवसेनेचे नेते प्रकाश वानकर, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. 

सहकार मंत्र्यांच्या पॅनेलची सर्वस्वी जबाबदारी ही सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यावरच असणार आहे. सध्या सहकारमंत्र्यांनी बाजार समितीच्या मुलभूत विकासाबरोबर शेतकर्‍यांच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजार पेठ मिळवून देण्यापर्यंतची तयारी ठेवली असून त्या विषयावरच ते शेतकरी मतदारांना साद घालत आहेत. तर दुसरीकडे गेली 30 ते 35 वर्षे बाजार समितीवर सत्ता उपभोगत असलेल्या सर्वपक्षीय आघाडीने सहकार मंत्री देशमुख हे सुडबुद्धीने वागत असून शेतकर्‍यांच्या विकासासाठी पुन्हा आम्हालाच संधी द्या, असे आवाहन केले आहे. दोन्ही बाजूने प्रचार सभा, गावभेट दौरे, होम टू होम भेटीगाठीवर भर दिला आहे. सर्वसामान्य जनता आता कोणाला कौल देणार हे निवडणूक निकालानंतरच लक्षात येणार असून सध्या तरी दोन्ही बाजूने प्रचारात आघाडी घेतल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.