Thu, Mar 21, 2019 23:22
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › सहकारमंत्र्यांच्या पॅनेलचे पानिपत!

सहकारमंत्र्यांच्या पॅनेलचे पानिपत!

Published On: Jul 03 2018 10:52PM | Last Updated: Jul 03 2018 10:47PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये शेतकरी गटातून निवडून द्यावयाच्या 15 जागांपैकी सर्वपक्षीय आघाडीच्या 13 जागा निवडून आल्या आहेत, तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागल्याने त्यांच्या गटाचे पानिपत झाले असून, बाजार समितीवर सर्वपक्षीय आघाडीचा झेंडा फडकला आहे. सत्ताधारी भाजपच्या दोन देशमुखांतील वादाचा फायदा उठवत काँग्रेसला बाजार समितीतील आपली सत्ता राखण्यात यश आले आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच मोठी चुरस निर्माण झाली होती. यामध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन पॅनल उभे केले होते. यासाठी रविवारी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी मंगळवारी सोरगाव येथील एसआरपी कॅम्पमध्ये पार पडली. यावेळी कळमण गणातून राष्ट्रवादीचे नेते बळीराम काका साठे यांचे चिरंजीव जितेंद्र साठे यांनी 2 हजार 754 मते मिळवीत संग्राम पाटील यांचा पराभव केला. पाटील यांना 1 हजार 190 मतांवर समाधान मानावे लागले आहे. नान्नज गणात प्रकाश चोरेकर हे विजयी झाले असून, त्यांना 2 हजार 110 मते, तर त्यांचे विरोधक इंद्रजित पवार यांना 1 हजार 670 मते पडली आहेत. अत्यंत चुरशीच्या लढतीत पाकणी गणात प्रकाश वानकर यांनी 1 हजार 993 मते मिळवीत सुनील गुंड यांचा पराभव केला. तर गुंड यांना 1 हजार 274 मते मिळाली आहेत. बोरामणी राखीव गणात काँग्रेसच्या राजकुमार वाघमारे यांनी 1 हजार 883 मते घेत विश्रांत गायकवाड यांचा पराभव केला, तर बाळे गणात काँगे्रसच्या विजया भोसले यांनी 1 हजार 512 मते घेत विजय संपादन केला असून त्यांनी मेनका राठोड यांचा पराभव केला आहे. राठोड यांना केवळ 712 मतांवर समाधान मानावे लागले. आघाडीचे पॅनेलप्रमुख माजी आमदार दिलीप माने यांनी हिरज गणातून 2 हजार 251 मते घेत सहकारमंत्री देशमुख यांचे विश्‍वासू सहकारी श्रीमंत बंडगर यांचा तब्बल 1 हजार 321 मतांनी पराभव केला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख कुंभारी गणातून सर्वाधिक 3 हजार 23 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी विरोधी उमेदवार शिरीष पाटील यांचा 2 हजार 244 मतांनी पराभव केला. मुस्ती गणामध्ये अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करुन मोठी चुरस निर्माण केली होती. मात्र याठिकाणी काँग्रेसचे श्रीशैल नरोळे यांनी सर्वाधिक 2 हजार 378 मते मिळवित सिद्रामप्पा पाटील यांचा 785 मतांनी पराभव केला. याठिकाणी सहकारमंत्र्यांच्या पॅनलचे उमेदवार सिध्दाराम हेले यांना केवळ 455 मतांवर समाधान मानावे लागले. कणबस गणातून 1 हजार 178 मते मिळवित माजी आमदार रतिकांत पाटील यांचे चिरंजीव अमर पाटील यांनी विजय संपादन केला असला तरी त्यांना हरिष पाटील यांनी कडवी झुंज दिली. त्यामुळे अमर पाटील हे केवळ 187 मतांनी विजयी झाले आहेत. भंडारकवठे गणातून काँग्रेसच्या वसंत पाटील यांनी 2 हजार 324 मते मिळवित माजी आमदार शिवशरण पाटील-बिराजदार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला, तर बिराजदार यांना 1 हजार 922 मते मिळाली आहेत. औराद गणातून काँग्रेसचे बाळासाहेब शेळके यांना 2 हजार 278 मते मिळाली, तर विरोधी उमेदवार संगप्पा केरके यांना 1 हजार 743 मते मिळाली आहेत. शेळके यांनी त्यांचा 535 मतांनी पराभव केला आहे. 

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलच्या केवळ दोन जागा निवडून आल्या असून यामध्ये होटगी गणातून भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांनी 2 हजार 997 मते घेतली आहेत, तर विरोधी उमेदवार मलकप्पा कोडले यांना 1 हजार 715 मते मिळाली आहेत. त्यामुळे चिवडशेट्टी यांनी कोडले यांचा तब्बल 1 हजार 282 मतांनी पराभव केला. कंदलगाव गणातून आप्पासाहेब पाटील यांनी सर्वपक्षीय आघाडीचे उमेदवार सुरेश हसापुरे यांचा पराभव केला असून आप्पासाहेब पाटील यांना 2 हजार 389, तर हसापुरे यांना 2 हजार 201 मते पडली आहेत. त्यामुळे हसापुरे यांचा याठिकाणी निसटता पराभव झाला. मंद्रुप गणातून माजी सभापती इंदुमती अलगोंडा यांनी 2 हजार 147 मते घेत सुनंदा ख्याडे यांचा 447 मतांनी पराभव केला आहे. 

व्यापारी अडते मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या दोन जागांवर बसवेश्‍वर इटकळे यांनी 657, तर केदारनाथ उंबरजे यांनी 700 मते मिळवित विजय संपादन केला आहे. हमाल-तोलार मतदारसंघातील एका जागेसाठी जवळपास 11 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी शिवानंद पुजारी यांनी 989 पैकी तब्बल 257 मते मिळवित दणदणीत विजय मिळविला आहे.