Thu, Jun 20, 2019 01:52होमपेज › Solapur › सोलापूर : १३ ग्रामपंचायत सदस्यांची पदे रद्द

सोलापूर : १३ ग्रामपंचायत सदस्यांची पदे रद्द

Published On: Aug 22 2018 12:10AM | Last Updated: Aug 22 2018 12:10AM सोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचे सदस्य आणि सरपंचांचे पद रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. त्यामुळे अनेक गावांत सत्ताधारी गटांतील सदस्यांनी पदे रद्द झाल्याने त्या ग्रामपंचायतींमध्ये आता सत्तांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मंगळवेढा येथील नंदूर ग्रामपंचायत सरपंचाने दोन वेळा निवडणूक लढविताना वेगवेगळे जातींचे दाखले दिल्याने गुरुय्या स्वामी यांचे सरपंचपद रद्द करण्यात आले आहे. मोहोळ तालुक्यातील हिंगणीनिपाणी ग्रामपंचायतीच्या गणेश गायकवाड, दिनेश गायकवाड, विमल थिटे व झिंगाडे यांनी निवडणूक खर्च वेळेत सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. बार्शी तालुक्यात ढेबरेवाडी चिंचोली ग्रामपंचायतीच्या अनिता दंडनाईक यांनीही निवडणूक खर्च न दिल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. करमाळा तालुक्यातील सौंदे ग्रामपंचायतीच्या मीना साळुंखे, गजाबाई खरात, गोरख आवटे यांनी पदावर असताना शासकीय योजनांचा लाभ घेतल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

सांगोला तालुक्यातील वाकीघेरडी मनिषा मेटकरी, निर्मला कोकरे, कमल लवटे यांनीही ग्रामपंचायतीची थकबाकी ठेवल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. माळशिरस तालुक्यातील महाळुंग ग्रामपंचायतीच्या गोरख मोहिते यांना तीन अपत्ये असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. करमाळा तालुक्यातील बाळेवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या अश्‍विनी लोंढे यांनाही तीन अपत्ये असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.