Sun, Mar 24, 2019 04:51होमपेज › Solapur › जिल्ह्यातील 120 ग्रा.पं.चे सामाजिक अंकेक्षण

जिल्ह्यातील 120 ग्रा.पं.चे सामाजिक अंकेक्षण

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 11:03PMसोलापूर : प्रतिनिधी  

सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या विविध कामांचे सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार असून यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील 120 गावांची निवड करण्यात आली असल्याची माहिती रोजगार हमी योजना विभागाचे उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांनी दिली आहे.सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर 40, अक्‍लकोट तालुक्यातील 40 आणि माळशिरस तालुक्यतील 40 गावांची यासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये सामाजिक अंकेक्षण विभागाच्या वतीने प्रशिक्षित लोकांची टीम येऊन हे अंकेक्षण करेल. 

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या रोजगार हमी योजनेतील कामांची पाहणी, झालेल्या कामांचा नेमका फायदा कोणाला झाला, यामध्ये कामांचा दर्जा राखला गेला की नाही, यामध्ये आर्थिक वितरणप्रणाली कशी होती या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी आलेल्या प्रशिक्षित लोकांना विशिष्ट फॉरमॅट देऊन संपूर्ण गावातील माहिती गोळा केली जाणार आहे. ती संपूर्ण माहिती संगणकावर घेऊन त्याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तहसीलदार, कृषी अधिकारी,  गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांनाही या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी पवार यांनी दिली. 

यासंदर्भात 25 दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्याच्या नियोजनाची तयारी करण्यासाठी सामाजिक अंकेक्षण संचालनालयाच्या संचालिका अंजली कानिटकर यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन यासंदर्भातील काही सूचना दिल्या. 19 जुलै ते 10 ऑगस्टदरम्यान हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून यासाठीची तयारी करण्याच्या सूचना दिल्या तसेच निवडलेल्या गावांमध्ये ग्रामसभा घेणे, त्यामध्ये सर्व्हे अंकेक्षणातून आलेली माहिती गावातील नागरिकांसमोर ठेवून त्याची वस्तुस्थिती पडताळून पाहण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतींमध्ये होणार विशेष ग्रामसभा

सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांत झालेल्या कामांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी निवडलेल्या गावात विशेष ग्रामसभा घेण्यात येणार असून आलेली माहिती गावकर्‍यांसमोर मांडण्यात येणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये आढळलेल्या त्रुटींची यादी जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात येणार आहे.