Wed, May 22, 2019 16:20होमपेज › Solapur › सोशल फाऊंडेशनतर्फे ‘मेक इन सोलापूर’

सोशल फाऊंडेशनतर्फे ‘मेक इन सोलापूर’

Published On: May 11 2018 9:58PM | Last Updated: May 11 2018 9:19PMसोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून यापुढे ‘मेक इन सोलापूर’ साकार करण्याचा आपला प्रयत्न असून सोलापूर जिल्ह्यातील 40 लाख सोलापूरकरांना सहभागी करून घेऊन सोलापूरचे सकारात्मक मार्केटिंग करण्यावर सोशल फाऊंडेशनचा भर असणार आहे. धार्मिक पर्यटनासह सोलापूर शहर व जिल्ह्यातील बलस्थानांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्दी मिळण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सोलापूर महोत्सव भरविण्याचा मानस आहे. याच पार्श्‍वभूमीवर येत्या 13 मे रोजी पुणे येथे बैठक घेणार असल्याचे राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे सांगितले. 

सातत्याने सोलापूरचा विकास आणि सोलापूरसंदर्भात सकारात्मक मार्केटिंग करुन सोलापूरला महाराष्ट्राच्या नकाशावर वेगळ्या अर्थाने पोहचवून सोलापूरचा विकास करण्याचे सूतोवाच करणारे दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार तथा राज्याचे सहकारमंत्री देशमुख यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम शुक्रवारी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी देशमुख बोलत होते. यावेळी महापालिका परिवहनचे माजी सभापती दैदिप्य वडापूरकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस उमेश कदम आदी उपस्थित होते.

सोलापूर सोशल फाऊंडेशन आणि त्या माध्यमातून सोलापूरचे मार्केटिंग व विकास या संकल्पने संदर्भात बोलताना देशमुख म्हणाले की, लोकमंगलशी कसलाही संबंध नसणारी, सोलापूरचे बलस्थाने ओळखून सोलापूरला नावारुपास  आणणारी  सोलापूर  सोशल फाऊंडेशन नावाची संस्था काढली असून यात व्यावसायिक काहीच नसणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशमुख म्हणाले, आपण एक ठेकेदार होतो. 1998-99 मध्ये काही मूठभर लोकांना एकत्रित करून सार्वजनिक जीवनात पाऊल ठेवले. यातूनच लोकमंगलची निर्मिती झाली. लोकमंगलच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केले. मात्र  राजकीय पाठबळामुळे लोकमंगल वाढत असल्याचा काही जणांनी आक्षेप घेतल्याने आपण यातून बाहेर पडून  ज्याला-त्याला जबाबदारी देऊन टाकली आहे. आता आपण सर्व घटकातील, शहरातून बाहेर, विदेशात गेलेल्या अशा 40 लाख लोकांना एकत्रित करुन सोलापूर सोशल फाऊंडेशन संस्थेतून कार्य करणार आहे. यासाठी सर्वांचा हातभार लागणार आहे. 

सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. शून्यातून विश्‍व निर्माण केलेल्या लोकांची माहिती एकत्रित करणार आहे. या लोकांकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात आणखी नवीन काय करता येईल, यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी आपण सोलापूरची माणसे शोधून एकत्रित आणत आहे. यासाठीच 13 मार्चला पुण्यात बैठक बोलावली आहे. अशा बैठकीतील संवादातूनच माणसे मिळणार आहेत. लाखो लोकांना एकत्रित करून सोलापुरातील  बलस्थाने ओळखून त्यांचे पुरेपूर मार्केटिंग करण्यावर भर दिला जाणार आहे. 

सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्‍वरांच्या यात्रेस, अक्षता सोहळ्यास राज्यातून 50 अधिकारी पाठविले पाहिजेत, लोकांना आकर्षण वाटले पाहिजे, असे मार्केटिंग केले पाहिजे. हेच ओळखून संस्था मार्केटिंग करण्यास सुरुवात करणार आहे. यासाठी लवकरच सोलापुरात विचार विनिमय करून कार्यालय काढण्यात येणार आहे. अधिक अधिक कार्यालये स्थापन केली जातील. सोलापूर सोशल फाऊंडेशन या संस्थेचे ब्रीद वाक्य, सिम्बॉल चिन्ह तयार केले जाणार आहे. हे विद्यार्थ्यांकडून करुन घेतले जाणार आहे. शेतीच्या दृष्टीने विचार करता सोलापुरात कृषी पर्यटन चालू करण्यावर भर राहील. यातून शेतकर्‍यांना चांगला आर्थिक मोबदला मिळण्यास मदत होणार असल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. 

नुकतेच मंत्रालयात आपण सोलापूर शहर व जिल्ह्याशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठक घेतली होती. या बैठकीत आपण सर्व सोलापूरशी संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना एकच आवाहन केले की, आपल्या सोलापूरसाठी काही तरी करावयाचे असल्याचे मनाशी पक्के ठरवून आपल्याशी संबंधित काहीही योगदान द्यावे. मंत्रालयीन कोणत्याही विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपल्या विभागातील कोणत्याही चांगल्या योजनांमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्याचा कसा समावेश होऊ शकतो, याबाबत सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. आपले गाव, तालुकाच नव्हे, तर जिल्हापातळीवर कोणतीही योजना देण्याबाबत विचार करावा. समजा चांगली योजना आहे आणि आपल्या सोलापूरचा काही प्रस्ताव नसेल तर संबंधित सोलापूरच्या अधिकार्‍यांना संपर्क करून पाठपुरावा करुन त्या चांगल्या योजनेत सोलापूर शहर वा जिल्ह्याचा समावेश कसा होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

सोलापूर जिल्ह्यात ऊस लागवडीसह विविध फळ लागवड मोठ्या प्रमाणावर होते. आपल्या जिल्ह्यातील अनेक फळ उत्पादक शेतकरी कृषीभूषण आहेत. ऊस उत्पादनात तर सोलापूर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्राला मागे टाकले असून सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने असल्याने सोलापूरवरील दुष्काळी जिल्हा ही ओळख पुसण्यास यामुळे मदतच होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 40 लाख सोलापूरकरांनी सोलापूरच्या कृषी पर्यटनाचे मार्केटिंग करण्याची गरज आहे. सोलापूरसारखा हुरडा महाराष्ट्रात कुठे मिळत नाही. सोलापूरची कडक भाकरी, शेंगाची चटणी यासह विविध अन्नपदार्थ चविष्ट आहेत. प्रत्येक सोलापूरकराने आपल्या सोलापूरच्या बलस्थानांचे सकारात्मक मार्केटिंग केल्यास सोलापूरचा विकास कोणीही रोखू शकणार नाही. परंतु त्यासाठी शहर व जिल्ह्यातील प्रत्येकाने यासाठी आपले योगदान देण्याची गरज असल्याचेही देशमुख म्हणाले.