Fri, Sep 21, 2018 02:15



होमपेज › Solapur › संतोष धोत्रेसह सहा जणांची टोळी नऊ तालुक्यांतून तडीपार

संतोष धोत्रेसह सहा जणांची टोळी नऊ तालुक्यांतून तडीपार

Published On: Jun 21 2018 1:18AM | Last Updated: Jun 20 2018 10:44PM



करकंब : वार्ताहर 

करकंब पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या करकंब, भोसे, बार्डी या तीन गावांतील टोळी प्रमुखासह सहा जणांची टोळी एक वर्षासाठी नऊ तालुक्यांतून तडीपार करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हा पोलिसप्रमुख एस. वीरेश प्रभू यांनी दिले असल्याची माहिती सपोनि उमेश धुमाळ यांनी दिली.

करकंब पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या करकंब, भोसे, बार्डी येथील सहा जणांच्या टोळीने बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी करकंब  पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी निखिल पिंगळे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.  या प्रस्तावाला पिंगळे यांनी मान्यता देऊन पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा पोलिसप्रमुख एस. वीरेश प्रभू यांच्याकडे सादर केला. यावर जिल्हा पोलिसप्रमुख यांनी चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी करमाळा यांची नेमणूक केली होती.

यामध्ये करमाळा उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या चौकशीअंती या टोळीवर दाखल असलेले गुन्हे, त्यांनी दिलेले म्हणणे, गोपनीय साक्षीदारांचे जबाब व टोळीने केलेले बेकायदेशीर कृत्य याचा  जिल्हा पोलिसप्रमुख यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या अहवालाचा व्यापक विचार करून जिल्हा पोलिसप्रमुख यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन 1951 चे कलम 55 मधील तरतुदीनुसार संतोष धोत्रे (टोळीप्रमुख), दीपक ढोबळे, सुभाष भरते, बाबा गायकवाड (रा. सर्व जण करकंब, ता. पंढरपूर) रमेश कोरके (रा. भोसे, ता. पंढरपूर), वैभव भोसले (रा. बार्डी, ता. पंढरपूर) या टोळीतील सदस्यांना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा, माढा, माळशिरस, सांगोला आणि मोहोळ, तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर व बारामती अशा एकूण नऊ तालुक्यांतून तडीपार करण्यात आले आहे.