Sun, May 26, 2019 11:07होमपेज › Solapur › सीताराम साखर कारखाना तोडणी वाहतूक बिल दर चार दिवसाला

सीताराम साखर कारखाना तोडणी वाहतूक बिल दर चार दिवसाला

Published On: Jan 06 2018 1:29AM | Last Updated: Jan 05 2018 8:50PM

बुकमार्क करा
पंढरपूर : प्रतिनिधी

सीताराम महाराज साखर कारखान्यासाठी बिगर उचल ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदारांची प्रत्येकी चार दिवसांची बिले विनाकपात रोखीने अदा करण्यात येतील. शेतकर्‍यांच्या अडचणी पाहून उपलब्ध जातीचा ऊस गाळपासाठी स्वीकारण्यात येईल, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक समाधान काळे यांनी दिली.

कारखाना कार्यस्थळावर झालेल्या ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. याच वेळी शासनाच्या भरारी पथकाने अचानक भेट देऊन कारखान्याचे वजनकाटा तपासणी केला.

मागील महिन्यापूर्वी सीताराम महाराज साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरू केला असून नियमितपणे कारखान्याचे गाळप सुरू आहे.  कारखान्याने बिगर उचल ऊस तोडणी व वाहतूक करणार्‍या ठेकेदारांना कोणत्याही प्रकारची रक्‍कम कपात न करता दर चार दिवसाला रोखीने बिले अदा करण्याची व्यवस्था केलेली आहे. सध्या वीज टंचाई व संभाव्य पाणी टंचाईचा विचार करता शेतकर्‍यांकडून उपलब्ध होईल त्या जातीचा ऊस तोडणी कार्यक्रम विचारात न घेता तोडण्यात येईल. शेतकर्‍यांना जिल्ह्यातील इतर साखर कारखान्याच्या बरोबरीने ऊस दर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी ऊस पुरवठा करावा असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक समाधान काळे यांनी केले आहे.

वजन काट्याची तपासणी

कारखान्याचा वजनकाटा तपासणीसाठी तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक जी. के. व्हनकडे, एस. जी. कुंभार. तालुका वजनकाटे निरीक्षक, पी. आर. शिंदे. तृतीय विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था साखर सोलापूर, विनोद शिंदे, तालुका पोलिस स्टेशन पंढरपूर तसेच शेतकरी संघयनेचे पदाधिकारी सचिन अरुण पाटील, संभाजी शिंदे व किर्तीकुमार गायकवाड यांचे भरारी पथकाने कारखान्याच्या वजनकाट्याची अचानक तपासणी केली. वजनकाटयाच्या तपासणीमध्ये ऊसाने भरलेल्या वाहनांचे कारखान्याचे वजनकाट्यावरील स्लीपचे वजन बरोबर असल्याचे पथक प्रमुख व्हनकडे यांनी सांगितले.